लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा : कधी नव्हे एवढा पावसाळा अनुभवलेल्या तालुक्यातील नागरिकांची पाणीटंचाईतून मात्र सुटका होण्याची सुतराम शक्यता सध्याच्या घडीला दृष्टिपथात नाही. तालुक्यातून पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी जीवनवाहिनी पूर्णा नदी उन्हाळ्याची सुरुवात होत असतानाच कोरडीठण्ण झाली आहे. कोरडे पात्र तालुक्यात पाणीटंचाईची चाहूल देत आहे.चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे पाणीटंचाईची दाहकता कमी असणार, असा कयास लावला जात होता. टंचाई निर्मूलनाचा पहिला टप्पा निरंक असला तरी एप्रिल, मेमध्ये खरी टंचाई जाणवणार असल्याचे भाकीत व्यक्त केले जात आहे. तालुकास्तरावर संभाव्य पाणीटंचाई आराखडासंदर्भात बैठकी सुरू असल्याचे संकेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मिळत आहेत.यंदा समाधानकारक पावसाळा झाल्याने ग्रामीण भागातील नद्या तसेच पाणी साठवण तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला होता. मात्र, आता त्यामधील पाणी आटून गेले असून, नदीसुद्धा कोरडी पडली आहे. यामुळे भविष्यात पाणीटंचाई उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाच वर्षांच्या दुष्काळानंतर समाधानकारक पावसाचा आनंद आता पाणीटंचाईच्या संकेताने विरला आहे.आतापासूनच जनावरांंचा पाणीप्रश्नतालुक्यातील आसेगाव पूर्णा पंचक्रोशीतील नदी-नाले कोरडे झाले आहेत. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या पूर्णा नदीत सद्यस्थितीत पाण्याची वाहती धारही नाही. पिण्याच्या पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसल्यामुळे वन्यपशूंसोबतच पाळीव जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच परिसरात गंभीर वळणावर आल्याचे चित्र आहे.
पूर्णा नदीचे पात्र कोरडेठण्ण चांदूरबाजार तालुक्यात धग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 6:00 AM
चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे पाणीटंचाईची दाहकता कमी असणार, असा कयास लावला जात होता. टंचाई निर्मूलनाचा पहिला टप्पा निरंक असला तरी एप्रिल, मेमध्ये खरी टंचाई जाणवणार असल्याचे भाकीत व्यक्त केले जात आहे.
ठळक मुद्देपाणीटंचाईची चाहूल। एप्रिल, मेमध्ये संकट उग्र; नागरिकांमध्ये चिंतेचे सावट