धामणगाव रेल्वे : एसटी प्रवासादरम्यान एका महिलेची ६६ हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली. अवघ्या दोन तासांत तळेगाव दशासर पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केली.
तालुक्यातील कावली येथील अंगणवाडी मदतनीस असलेल्या इंदू नारायणराव मानकर (३५) या २५ डिसेंबर रोजी दुपारी १.३० च्या सुमारास वर्धा येथे जाण्यासाठी तळेगाव दशासर येथून बसमध्ये बसल्या. त्यांचेसोबतच तीन संशयित महिलासुद्धा बसमध्ये चढल्या. त्या देवगावला उतरल्या व एसटी वर्धेकडे निघाली. मानकर यांना शंका आल्याने त्यांनी आपली पिशवी तपासली असता, त्यात ठेवलेली पर्स त्यांना दिसून आली नाही. सदर पर्समध्ये ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोथ व १ हजार रुपये असा एकूण ६६ हजार रुपयांचा ऐवज ठेवला होता. तो चोरी गेल्याचे त्यांचे निदर्शनास येताच त्या तेथेच उतरल्या. तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
असा झाला पर्दाफाश
माहिती मिळताच तळेगाव दशासर पोलिसांचे एक पथक देवगावला रवाना झाले. देवगाव बस थांब्यावरील ऑटोचालकानुसार, त्या संशयित महिला ऑटोत बसून बाभूळगावकडे गेल्याचे पोलिसांना समजले. पथक बाभूळगावच्या दिशेने गेला असता, सदर महिला ऑटो सोडून बसमध्ये गेल्याचे समजले. ती बस थांबवून त्या तीन महिलांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तपासादरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन माल काढून दिला. ही कारवाई एपीआय ए. के. कांबळे यांच्या नेतृवात करण्यात आली. विशेषत: चालक शिपाई प्रदीप मस्के यांनी सिने स्टाईल पोलीस जीप चालवून आरोपींना पाठलाग केला. त्यामुळे आरोपींना पकडणे शक्य झाले.