वरूड : श्रीक्षेत्र झुंज येथील वर्धा नदीच्या पात्रात मटरे कुटुंबावर काळाने घाला घातला. घरातील कर्ता पुरुष असलेले नारायण मटरे यांच्यासह त्यांच्या दोन मुली व नातीला जलसमाधी मिळाली. बेपत्ता असलेल्या आठ जणांपैकी एकाचाही मृतदेह मिळालेला नाही, शिवाय डोंगाही बेपत्ता आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजता श्रीक्षेत्र झुंज येथे वर्धा नदीपात्रात ११ जण बोटीसह बुडाल्यापासून एनडीआरएफचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मंगळवारी तीन मृतदेह हाती लागले. तथापि, बुधवारी दिवसभरात शोध घेऊनही एकाचाही मृतदेह हाती लागलेला नाही. महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांसह आ. देवेन्द्र भुयार हे बुधवारी दिवसभर घटनास्थळी तळ ठोकून होते.
मृतांमध्ये नावाडी नारायण मटरे (४५, रा. गाडेगाव) यांच्यासह पूनम शिवणकर (२६, रा. तिवसाघाट) ही विवाहित व अविवाहित निशा (२२) या मुलीही बुडाल्या. पूनमची दोन वर्षांची मुलगी वंशिका हिचा मृतदेह मंगळवारीच बाहेर काढण्यात आला. सुखदेवराव खंडाळे यांच्या आदिती (१३) व मोहिनी (११, दोन्ही रा. तारसावंगा) या मुलींनाही जलसमाधी मिळाली. एक वर्षापूर्वी विवाह झालेली अश्विनी अमर खंडाळे (२५, रा. तारासावंगा) ही संसाराचे स्वप्न रंगवत असतानाच तुटून पाण्यात बुडाली. पती अमर हा शेतावर काम करीत होता. घटनेची माहिती मिळताच त्याने तडक घटनास्थळ गाठले. एक वर्षापूर्वी लग्न झालेले दाम्पत्य ऋषाली अतुल वाघमारे (१९) व अतुल गणेश वाघमारे (२५, रा. सावंगा) यांचेही संसाराचे स्वप्न अधुरेच राहिले.
आशेपोटी आसुसले डोळे
बुधवारी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना तिन्ही कुटुंबातील सदस्य तसेच आप्तपरिवार आशेच्या हिंदोळ्यावर होते. कुणाला आपली मुलगी, कुणाला पत्नी, तर कुणाला बहीण, तर कुणाला बंधू कोणत्याही क्षणी जिवंत असल्याची माहिती कळेल, या अपेक्षेने हे सर्व जण श्रीक्षेत्र झुंज येथील अथांग पात्राकडे आसुसलेल्या नजरेने पाहत होते.
---------------
ग्रामस्थांकडून मदत
आपल्या आप्तांची प्रतीक्षा करीत असलेले कुटुंबीय व एनडीआरएफचे जवान यांच्यासाठी पाणी-चहा अशी व्यवस्था नजीकच्या सुहृद ग्रामस्थांनी केली. एकढेच नव्हे तर त्यांना धीर दिला.
-----------------
नौकासुद्धा बेपत्ताच!
आठ लोकासह नौकासुद्धा बुडाल्यापासून बेपत्ता आहे. शोधपथकाला नौकासुद्धा सापडलेली नसल्याने नेमका अपघात कुठे घडला, हा शोध रेस्क्यू पथक घेत आहे.