लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती: संयुक्त कुटुंब म्हणून एकाच घरात सोबत राहणाऱ्या काकांच्या घरातून तब्बल १३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपी पुतण्याची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. मोहम्मद वसीम सौदागर असे आरोपीचे नाव आहे. त्याचेकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने, मनगटी घड्याळ व १ लाख रुपये वगळता संपूर्ण रोख जप्त करण्यात आली. चोरी केल्यानंतर आरोपीने इंदूरला जाऊन साहित्य खरेदी केले. त्यामुळेच तो पोलिसांच्या रडारवर आला. अन् पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला. क्षणार्धात त्याने काकाकडे केलेल्या चोरीची कबुली दिली.
धारणी पोलिसांनी माजी नगरसेवक असिफ सौदागर यांच्या घरात झालेल्या या जबर चोरीचा छडा लावून घरातील सदस्य असलेल्या भावाच्या मुलाला मुद्देमालासह ३ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली होती. त्याला ४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून कोणतीही रक्कम किंवा दागिने जप्त करणे शिल्लक नसल्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नव्हती. न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडी मंजूर करून तुरुंगात रवानगी केली. आरोपीकडून दाखल केलेल्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
असा झाला पर्दाफाश
दरम्यान, एवढ्या मोठ्या चोरीचा कुठलाच सुगावा लागत नसल्याने पोलिसांनी तपासाची दिशा फिर्यादी आसिफ सौदागर यांच्या कौटुंबिक सदस्यांकडे वळविला. चौकशीदरम्यान, आरोपी मोहम्मद वसीम सौदागर हा घटनेनंतर इंदूरला गेला. तेथून त्याने सुमारे १ लाख रुपयांचे हार्डवेअरशी संबंधित साहित्य विकत आणल्याचे उघड झाले. तो धागा पकडून पोलिसांनी त्याची उलटतपासणी घेतली. त्यात तो अलगद अडकला. आता चोरीची कबुली दिल्याशिवाय पर्यायच नाही, हे उमगल्याने त्याने चोरलेला मुद्देमाल कुठे दडवून ठेवला, ते सांगितले. स्वत:च्या बेडरूममधील दिवाणाच्या आत त्याने सोन्याचांदीचे दागिने व रोख एका थैलीत बांधून ठेवली होती.
१७ जानेवारी रोजी घडली होती चोरी
१७ जानेवारी रोजी सकाळी संपुर्ण सौदागर कुटूंब अचलपूर येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. ते १८ जानेवारी रोजी सकाळी ९ च्या सुमारास धारणी येथे घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. तक्रारीनुसार, ९ लाख ३० हजार ४२० रुपये किमतींचे सोन्याचे दागिने, ७३ हजार २०० रुपयांचे चांदीचे दागिने, तर २ लाख २५ हजार रुपये रोख, मनगटी घड्याळ असा एकूण १२ लाख ३३ हजार ६२० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी १९ जानेवारी रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१३ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपी हा इंदूरला जाऊन खरेदी करून आल्याचा धागा पकडत मोहीम फत्ते करण्यात आली.
- विलास कुळकर्णी, ठाणेदार, धारणी.
------------