पीआरसीप्रमुखांची खंत : चांदूर, धामणगाव पं.स.ची पाहणी धामणगाव रेल्वे : राज्यात आर्थिकीकरण आणि प्रशासकीय पारदर्शकतेसाठी म्हणून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमरावती जि़ल्हा परिषदेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरल्याची खंत पंचायतराज समिती प्रमुख संभाजी निलंगेकर यांनी व्यक्त केली़ ४८ तासांचे कामकाज पूर्ण करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव विधिमंडळासमोर मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़शुक्रवारी चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे या दोन तालुक्यांतील पंचायत समित्यांची आढावा बैठक घेऊन ‘लोकमत’शी औपचारिक चर्चा करताना निलंगेकर म्हणाले, आतापर्यंत राज्यातील सहा जिल्हा परिषदांची पाहणी केली. परंतु अमरावती जिल्हा परिषदेमध्ये शालेय पोषण आहार व बांधकाम अशा अनेक विभागांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले आहे़ मेळघाटातील आदिवासींचा कुपोषणाचा प्रश्न संपूर्ण राज्यात गाजत असताना जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतेच पाऊल उचलले नाहीत. धामणगाव पंचायत समितीमध्ये कोणत्या वर्षी किती खर्च झाला, अखेरीस पं़स़जवळ किती निधी शिल्लक आहे़ प़ंस़ला वाढीव उपकराबाबत मिळालेली रक्कम, मार्च अखेरीस किती कामे पूर्ण झालीत जि़प़च्या कोणकोणत्या विभाग प्रमुखांनी पं़स़ला भेटी दिल्यात, प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधांच्या साठ्यांची कितीवेळा तपासणी केली, व्यवस्थापन समितीने घेतलेल्या बैठकी, अनेक गावांचा एकाच ग्रामसेवकाकडे असलेला कारभार, मागासवर्गियांच्या कल्याणकारी योजना, जवाहर रोजगार योजनेंतर्गत झालेली कामे, इंदिरा अवास घरकूल योजना, दलित वस्ती अशा ३१ प्रश्नांचा आढावा निलंगेकर यांनी घेतला़ यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, पं़स़ सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख, सदस्य वनिता राऊत, सचिन पाटील, रोशन कंगाले यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)
जि.प.ची गुणवत्ता घसरली
By admin | Published: November 07, 2015 12:16 AM