शिक्षक महासंघाच्या लढ्याचे यश : इयत्ता ९ व १० वीला मिळणार तीन शिक्षकअमरावती: इयत्ता ९ व १० वीत ४० पटसंख्या असल्यास आता तीन शिक्षकांची पदे मंजूर करण्यात येतील, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यात अतिरिक्त असलेल्या १७ हजार २०० शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटला आहे. त्याकरिता शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी प्रदीर्घ लढा दिला असून त्यांच्या लढ्याचे हे यश मानले जात आहे.शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानुसार इयत्ता ९ व १० वीत ४० पटसंख्या असल्यास तीन शिक्षकांचे पदे मंजूर करता येतात. १७,२०० अतिरिक्त शिक्षकांना न्याय मिळावा, यासाठी शिक्षक महासंघ व राज्य मुख्याध्यापक संघाने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. शिक्षण आयुक्तांनी निर्गमित केलेल्या निर्णयाचे शिक्षक महासंघाने संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी स्वागत केले आहे. यापूर्वी संचमान्यतेच्या त्रुटीमुळे काही शिक्षक वेतनापासून वंचित होते. याबाबत २० टक्के अनुदानास पात्र शाळांची संचमान्यता हेतुपुरस्सरपणे टाळण्यात आली होती. शासन निर्णयाप्रमाणे इयत्ता ९ व १० वीत तीन शिक्षक मिळतील. आतापर्यंत इतकी पटसंख्या असतानाही दोनच शिक्षक देण्यात आले. परिणामी एक शिक्षक अतिरिक्त ठरवून वेतनापासून वंचित ठेवण्याचा डाव रचल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. सन २०१५-१६ च्या संचमान्यतेने वेतनापासून वंचित पदावरच घाला घातलेला होता. यासंबंधी शिक्षण आयुक्तांना निवेदन देऊन मंत्रालयात सुद्धा पाठपुरावा करण्यात आला. शिक्षक जीवनाच्या कुठल्याही वळणावर पोहोचू नये, यासाठी हा पाठपुरावा करण्यासाठी शेखर भोयर यांनी सातत्याने शासनाकडे दाद मागितली. परिणामी शिक्षण आयुक्त कार्यालयाने अतिरिक्त शिक्षकांबाबत नवा निणरय निर्गमित केला आहे. ४० पटसंख्या असल्यास इयत्ता ९ व १० वीसाठी तीन शिक्षक पदे मंजूर करण्यात आली आहे. हा निर्णय शिक्षकांच्या अस्मितेचा विजय असल्याचे मत शिक्षक महासंघाने शेखर भोयर यांनी व्यक्त केले आहे.
१७,२०० अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2017 12:08 AM