शासनाची नाराजी : उच्च तंत्र शिक्षण विभागाचेही ताशेरेअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने कोणतीही पूर्वतयारी न करता सुरू केलेले आॅनलाईन मूल्यांकन आणि त्यानंतर उडालेल्या गोंधळाबाबत राज्य शासनाने नाराजी व्यक्त केली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या निकालावरून उच्च व तंत्र शिक्षण विभागानेही ताशेरे ओढल्याची माहिती मिळाली आहे.विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा विषयांचे ‘एण्ड टू एण्ड’ आॅनलाईन कामे बंगळूरू येथील माइंड लॉजिक या एजन्सीकडे सोपविली होती. मात्र विद्यापीठाने कोणतीही तयारी न करता अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमांची परीक्षा आॅनलाईन घेतली. अशातच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत असंख्य चुका असल्याने आॅनलाईन मूल्यांकन वेळेत होऊ शकले नाही. विद्यापीठ कायदानुसार परीक्षा आटोपल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे नियमावली आहे. परंतु १०० दिवसांचा कालावधी लोटला असताना परीक्षांचे निकाल लागू शकले नाही. निकाल कधी लागणार ही कैफियत घेऊन विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठात धडक दिली. गत महिन्यात विद्यार्थ्यांचे मोर्चे, आंदोलन, कुलगुरुंना घेराव आदी भानगडींनी विद्यापीठाचा कारभार गाजला. अशातही कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी दिवस-रात्र एक करून परीक्षांचे निकाल लावून विद्यार्थ्यांचा आक्रोश कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यापीठाने आॅनलाईन निकाल, मूल्यांकन, परीक्षांची कामे एजन्सीला सोपविताना यातील तांत्रिक अडचणी, समस्या जाणून न घेता ती सर्व कामे एजन्सीला सोपविण्यामागील कारण काय, असा सवाल उपस्थित करीत याविषयी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या प्रश्नावर बोट ठेवले आहे. हा सर्व प्रकार माइंड लॉजीकच्या गोंधळामुळे झाल्याचे कारण विद्यापीठ प्रशासनाने पुढे करून आम्ही योग्य, असे भासविण्याचा अफलातून प्रयत्न चालविला आहे. परंतु राज्य शासनाकडे आॅनलाईन निकालाबाबत सातत्याने मिळत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या एकुणच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)माइंड लॉजिकवर कायदेशीर कारवाईची तयारीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आॅनलाईन निकालात गोंधळ उडाल्याप्रकरणी माइंड लॉजीक या एजन्सीवर कायदेशिर कारवाई करण्याची तयारी चालविली आहे. करारनाम्यानुसार सदर एजन्सीने वेळेच्या आत परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ कामे केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. माइंड लॉजीकवर दंडात्मक आणि कायदेशिर कारवाईसाठी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी तयारी चालविल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
विद्यापीठाच्या आॅनलाईन मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह
By admin | Published: May 01, 2017 12:08 AM