चांदूर बाजार : कोरोना महामारीमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लागणारे गणवेश शिवणाऱ्या कारागिरांच्या हाताला काम उरले नाही. तसेच रेडिमेड गणवेशालाही मागणी नसल्याने दुकानदारांचे नुकसान होत आहे.
गतवर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनामुळे शाळा सुरू होणार की नाही, याबाबत अनिश्चितता असल्याने टेलरसह व्यावसायिकांची आर्थिक अडचण झाली आहे. शाळा, महाविद्यालये नियमित सुरू असताना विद्यार्थी कापड घेऊन टेलरकडे यायचे व आपल्या मापाचे गणवेश शिवून घ्यायचे. काही विद्यार्थी रेडिमेड दुकानातून गणवेश
विकत घ्यायचे. या दोन्ही व्यावसायिकांचा धंदा दोन हंगामापासून अडचणीत आला आहे. विद्यार्थी परीक्षेविना पुढील वर्गात गेल्याने त्यांनाही आपण कोणत्या वर्गात आहोत, हे माहिती नाही. टेलरकडे शाळेच्या गणवेशासोबतच लग्नसराईतीलही कपडे नसल्यात जमा आहे.
आता अटी व शर्तीच्या अधीन राहून काही व्यवसाय सुरू झाल्याने दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. अनावश्यक खर्चासाठी सर्वसामान्यांकडे पैसा नसल्याने वेळ भागविणे सुरू आहे. यामुळे नवीन कपड्यांची खरेदी व टेलरकडून शिवण्याचे काम कमी झाले आहे. ग्राहक येत नसल्याने बऱ्याच टेलरच्या दुकानांसमोर येथे शाळेचे गणवेश शिवून मिळतील व प्रत्येक शाळा, कॉलेजचे गणवेशाचे कापडही उपलब्ध आहे, अशा पाट्या लावण्याची वेळच आली नाही.
ग्रामीण भागात १५ ऑगस्टपर्यंत हे काम चालत होते. शाळा बंद असल्याने हे कामही बंद आहे. त्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शैक्षणिक साहित्याच्या क्षेत्राशी अनेक लहान - मोठे व्यावसायिक निगडित आहेत. यात गणवेश, दप्तर, वॉटरबॅग, रेनकोट, बूट असे साहित्य विक्री करणाऱ्याचा समावेश आहे. शाळेच्या गणवेशाबाबत अद्याप कुठल्याच पालकांकडून विचारणा होत नसल्याचे गणवेश विक्रेत्याने सांगितले.
(डबे, पाण्याच्या बाटल्या, बूट, हातमोजे, पायमोजे असे साहित्य फुटपाथवरील दुकानात विकले जाते. यातून त्यांना हंगामी रोजगार उपलब्ध होतो. परंतु यंदा ग्राहक फिरकलेच नाहीत. रोज सामान बाहेर काढायचे अन ठेवायचे, असा क्रम सुरू आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत त्यांना उपाय नाही. यातील अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक जणांनी व्यवसायाकरिता कर्ज घेतले आहे. मात्र, यंदा व्यवसाय नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे.)