- अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे प्रकल्पांतर्गत तीन वर्षांत तोडल्या गेलेल्या वृक्षांच्या अनुषंगाने लोकसभेत तारांकित प्रश्न टाकण्यात आला आहे.अमरावती, यवतमाळसह राज्याच्या रस्त्यांच्या कामात मोठमोठी वृक्ष तोडली गेलीत. मालकी हक्क नसतानाही वनविभागाकडून परवानगी घेऊन मोठ्या प्रमाणातही वृक्षतोड करण्यात आली. यात वनक्षेत्रातीलही झाडांचा समावेश आहे. संबंधितांना फायदा पोहचविण्याच्या दृष्टीने वरिष्ठांच्या आदेशाने त्या झाडांचे मूल्यांकनही कमी दाखविले गेले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून आकोट-परतवाडा-बैतूल मार्गावर कारला ते बहिरम दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ५ हजार ४६ झाडांची कत्तल केल्या गेली. या वृक्षतोडीस परवानगी देताना मालकी हक्काबाबतचा सातबारा, आठ अ, फेरफारसह आवश्यक दस्तऐवजांकडे वनविभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.लोकसभेतील तारांकित प्रश्न क्रमांक ४,७१७ च्या अनुषंगाने २०१६, २०१७ आणि २०१८ या वर्षातील वर्षनिहाय वृक्षतोड झालेल्या वृक्षांची संख्या व वृक्षतोडीनंतर वनविभागाकडून लावल्या गेलेल्या वृक्षांची संख्या केंद्र शासनाकडून १३ डिसेंबर २०१८ च्या पत्राद्वारे मागविण्यात आली आहे. देशपातळीवर ही संख्या मागविली गेली आहे.मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती यांच्या कार्यालयाकडून १४ डिसेंबर १८ च्या पत्राद्वारे उपवनसंरक्षक अमरावती, पूर्व मेळघाट, पश्चिम मेळघाट व बुलडाणा यांच्याकडून माहिती मागवली होती. पण, ही माहिती संबंधित उपवनसंरक्षकांकडून पाठविली गेली नाही. यावर विभागीय वनाधिकारी (दक्षता) यांनी १८ डिसेंबरला एका पत्राद्वारे तातडीने माहिती पाठविण्यास संबंधित उपवनसंरक्षकांना कळविले आहे. या तारांकित प्रश्नावर २१ डिसेंबरला सरकारला उत्तर द्यावयाचे आहे.
लोकसभेतील तारांकित प्रश्न केरळशी संबंधित आहे. प्रश्नाच्या अनुषंगाने संपूर्ण भारतातून माहिती मागविण्यात आली आहे. तीन वर्षांतील वृक्षतोड आणि लावल्या गेलेल्या वृक्षांची संख्या त्यात मागितली आहे.- एच. एस. वाघमोडे,विभागीय वनधिकारी (दक्षता)मुख्य वनसंरक्षक, (प्रादेश्कि), अमरावती