अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे शिक्षण व ग्रामविकासमंत्री यांच्या दरबारात पाेहोचवले आहेत. शिक्षकांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊ व प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देवीदास बसवदे, कल्याण लवांदे, दीपक भुजबळ, संजीवन जगदाळे, विजय पल्लेवाड आदींच्या शिष्टमंडळाला दिले.
२००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षकांच्या संचित अर्जित रजेचे रोखीकरण करावे. शिक्षकांना अर्जित रजा देय केल्यामुळे तसेच आदिवासी विभागासह विविध विभागांतील शिक्षकांना अर्जित रजेचा लाभ दिला जात असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षकांना त्याचा लाभ दिला जावा. जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली, वेतनासाठी सीएमी प्रणाली लागू करावी आदी विषयांकडे मंत्र्याचे लक्ष वेधले. या सर्व मागण्यांबाबत लवकरच बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन संघाच्या शिष्टमंडळाला मंत्र्यांनी दिल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किरण पाटील यांनी दिली आहे.