नरेंद्र जावरे
अमरावती : मेळघाटच्या धारणी तालुक्यात चिपोली परिसरात ४० पेक्षा अधिक नागरिकांना चावा घेणाऱ्या मृत लांडग्याचा अहवाल बंगळुरु येथील प्रयोगशाळेतून वनविभागाला प्राप्त झाला आहे. रेबिजमुळे लांडगा चवताळल्याची धक्कादायक माहिती त्याद्वारे पुढले आली आहे. यामुळे जंगलातील वाघ, बिबट व इतरही वन्यप्राण्यांना धोका होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. यादरम्यान वन आणि व्याघ्र प्रकल्पात चार वनपरिक्षेत्र अधिकारी व ५० कर्मचारी रात्रंदिवस गस्तीवर असून, गावानजीक चवताळलेला लांडगा आढळल्यास तात्काळ ट्रँक्यूलायझरचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या धूळघाट रेल्वे-धारणी परिक्षेत्रात मागील महिन्यात दोन लांडग्यांनी धुमाकूळ घातला. १५ दिवसापूर्वी २७ जणांना चवताळलेल्या लांडग्याने चावा घेतला. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी लांडग्याला ठार केले होते. त्यामुळे दहशत संपली, असे नागरिकांना वाटत असतानाच धारणी व परिसरात पुन्हा शनिवार व रविवार असे दोन दिवस चवताळलेल्या लांडग्याने आठपेक्षा अधिक जणांना चावा घेतला. त्यात एका बालकाचाही समावेश आहे. धारणीनजीकच्या बासपानीजवळ दुपारी लांडगा मृतावस्थेत आढळला असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी शुभांगी डेहनकर यांनी सांगितले. धारणीचे पशुवैद्यकीय अधिकारी मनोज आडे, जी.एम. वानखडे, वैभव पाटील यांनी शवविच्छेदन केले व प्रयोगशाळेत शरीरातील नमुने पाठविण्यात आले. खबरदारीची उपाययोजना केली जात असून, गावागावांत मुनादी, पोस्टर लावून जनजागृती केली जात आहे. मांडवा, बासपाणी, बोबदो, टिटंबा, जुटपाणी, राणीतंबोली, टेंभली गावांमध्ये आदिवासींच्या सहकार्याने मोहीम सुरू आहे.
अहवालामुळे वाढली धाकधूक
चिपोलीनजीक मृतावस्थेत आढळलेल्या लांडग्याचा प्रयोगशाळेतील अहवाल वनविभागाला प्राप्त झाला. त्याला रेबिज झाल्याचे स्पष्ट करण्यात आले, तर सोमवारी दुपारी मृतावस्थेत आढळलेला लांडगासुद्धा तशाच प्रकारचे लक्षणे असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात बंगळुरु येथील प्रयोगशाळेत नमुने पाठविला जात असल्याचे स्पष्ट केले.
वाघ, बिबटेही धोक्यात
चवताळलेल्या दोन लांडग्यांचा नागरिकांना चावा घेण्याचे किमान २२ दिवसांचे अंतर आहे. नागरी वस्तीत येऊन नागरिकांना चावा घेत असताना मेळघाटच्या अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात वाघ, बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांनासुद्धा या चवताळलेल्या लांडग्यांपासून धोका निर्माण झाला आहे.
चार आरएफओ, ५० कर्मचारी गस्तीवर
मेळघाट व्याघ्र प्रकल्प व प्रादेशिक वनविभागातील वनपरिक्षेत्रात धूळघाट रेल्वे/सुसर्दा आरएफओ शुभांगी डेहनकर, धारणी आरएफओ पुष्पा सातारकर, ढाकणा आरएफओ ठाकरे व ट्रँक्यूलायझेशन टीमचे आरएफओ राजेश महल्लेसह ५० कर्मचारी रात्रंदिवस गस्तीवर आहेत. मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, उपवनसंरक्षक गिन्नी सिंग प्रत्येक हालचालीबद्दल माहिती घेत आहेत.
वीस दिवसापूर्वी चिपोली येथे मृतावस्थेत आढळलेल्या लांडग्याचा प्रयोगशाळेतील अहवाल प्राप्त झाला. रेबीज असल्याचे स्पष्ट आहे. सोमवारी दुसरा लांडगा मृतावस्थेत आढळला. दोघात २२ दिवसांचे अंतर आहे. गावागावांमध्ये मुनादी दिली जात आहे. शिवारावर चवताळलेला लांडगा दिसताच बेशुद्ध करण्यासाठी रात्रंदिवस गस्त होत आहे. चार अधिकारी व ५० कर्मचारी यासाठी तैनात आहेत. वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
- शुभांगी डेहनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, धुळघाट रेल्वे /सुसर्दा, ता. धारणी
बासपाणी येथे मृतावस्थेत आढळलेल्या लांडग्याचे शवविच्छेदन तीन डॉक्टरांच्या चमूने केले. प्राथमिकदृष्ट्या रेबीज असल्याचा अंदाज आहे. बंगळुरु येथील प्रयोगशाळेतून अहवाल आल्यावर खरे कारण स्पष्ट होईल. नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने कळविले जात आहे.
- मनोज आडे, पशुवैद्यकीय अधिकारी, धारणी