आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरात स्टंट राईडरच्या धुमाकुळाने झालेल्या अपघाताची पार्श्वभूमी पाहता पोलिसांकडून रेसर बाईकचे व्हेरीफिकेश केले जाणार आहे. स्टंट राईडर ज्या कॅफे हॉटस्पॉटवर थांबतात, तेथे पोलीस नजर ठेवून राहणार आहे. 'लोकमत' ने स्टंटबाजी करणाऱ्यांचे कारनामे लोकदरबारी मांडताच पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आता पुन्हा स्टंटबाज पोलिसांच्या रडारवर आले आहेत.पोलीस आयुक्तालय हद्दीत धोकादायक वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम १८ सप्टेंबर रोजी शहरात चालविण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी तब्बल ४१९ वाहनांवर रॅश ड्राईव्हिंगच्या केसेस केल्यात. रेसर बाईकस्वारांना चलान देऊन २ लाख ४७ हजार ७४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. सोबत वाहनचालकांच्या पालकांना बोलावून त्यांना समजसुद्धा देण्यात आला होता. त्यावेळी स्टंटबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. मात्र, आता पुन्हा स्टंट राईडर अॅक्टीव्ह झाल्याचे राजापेठ हद्दीत घडलेल्या अपघातांच्या घटनांवरून निदर्शनास आले आहे. यासंबंधाने 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करून स्टंट राईडरचे कारनामे उघड केले. त्या अनुषंगाने या स्टंटराईडरचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पावले उचलली आहेत. स्टंट राईडींग करणारे हे तरुण शहरातील विविध कॅफे, गार्डन किंवा निवांत ठिकाणाचा सहारा घेतात. मुलींना आकर्षित करण्यासाठी रेसर बाईकवर स्टंटबाजी करतात. लब्धप्रतिष्ठित आई-वडिलांकडून गिफ्ट म्हणून मिळालेली रेसर बाईक धूम स्टाईलने रस्त्यावर पळवितात. त्यांना आईवडिलांचे प्रोत्साहन मिळत असल्यामुळे हे तरुण शहरात बेफाम वाहने चालवून स्टंटबाजीसुद्धा करतात. त्यांचे हे कारनामे अन्य वाहनचालकांना धोकादायक ठरत असल्याची पुसटशी कल्पनाही हे स्टंट राईडर करीत नाही. मात्र, आता हे स्टंटराईडर पुन्हा पोलिसांच्या रडारवर आले असून त्यांच्या रेसर बाईकचे व्हेरिफिकेशन पोलीस करणार आहेत. या मुलांची सर्व माहिती गोळा करून त्यांच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावणार आहेत.
रेसर बाईकचे पोलिसांकडून व्हेरीफिकेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:28 AM
शहरात स्टंट राईडरच्या धुमाकुळाने झालेल्या अपघाताची पार्श्वभूमी पाहता पोलिसांकडून रेसर बाईकचे व्हेरीफिकेश केले जाणार आहे.
ठळक मुद्देस्टंट राईडरच्या हॉटस्पॉटवर लक्ष : स्टंटबाज पुन्हा रडारवर