अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात खासगी कर्मचारी आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या संगनमताने अभियांत्रिकी मॅकेनिक्स विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब २९ मे रोजी उघडकीस आली. त्यामुळे विद्यापीठात पेपर फुटीचे रॅकेट असल्याच्या शंकेला दुजोरा मिळाला आहे. हे प्रकरण थेट पोलिसांत न देता विद्यापीठाने आता चौकशीचा फार्स अवलंबला आहे. परीक्षा विभागातील स्पायरल बाईंड या कंपनीच्या अधिनस्थ आशिष राऊत, विनय रोहणकर हे दोघे खासगी कर्मचारी कार्यरत आहेत. वाशीम येथील संमती अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका फुटल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर परीक्षा विभागाने संमती महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली असता, आशिष राऊत नामक युवकाकडून प्रश्नपत्रिका मागविल्याची कबुली त्याने दिली.विद्यापीठात खासगी कर्मचा-याकडून १० मिनिटांअगोदरच प्रश्नपत्रिका पाठविली जात होती. ती तातडीने डाऊनलोड करून आशिष राऊतच्या मोबाईलमध्ये व्हॉट्स अॅपवर यायची. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे विद्यापीठाच्या लक्षात आले. संमती महाविद्यालयातील बोरे नामक कर्मचारी यात गुंतल्याचे समोर आले आहे. प्रश्नपत्रिका ऑनलाइन वितरण पद्धतीने पाठविली जात असल्याने त्यावर संबंधित परीक्षा केंद्राचा क्रमांक वॉटर मार्कच्या स्वरूपात प्रश्नपत्रिकेवर प्रिंट होत होत्या. आशिष राऊत याच्याकडून पाठविली जाणा-या अनेक प्रश्नपत्रिकांवर तोच वॉटर मार्क आढळून आल्याने परीक्षा विभागाने संमती महाविद्यालयाची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रश्नपत्रिका ऑनलाइन प्रिंट केल्यानंतर त्याची छायाचित्र आशिष हा एका घुसखोर तरुणाच्या व्हॉट्स अॅपवर पाठवित होता. त्यानंतर ती व्यक्ती प्रश्नपत्रिका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठी रक्कम घेऊन विकत असल्याची बाबदेखील यानिमित्ताने समोर आली आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी केल्यास अनेकांचे हात ओले झाल्याची शंका नाकारता येत नाही. विद्यापीठाने खासगी कर्मचारी आशिष राऊत याचा मोबाईल जप्त केला असून, एफ.सी. रघुवंशी आणि ए.बी. मराठे या द्विसदस्यीय समितीकडे याबातच्या चौकशीची धुरा सोपविली आहे.सारणी विभागाने केला पर्दाफाशअभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिका वेळेपूर्वीच ऑनलाइन जात असल्याचे विद्यापीठाच्या सारणी विभागाचे उपकुलसचिव दशमुखे यांनी पर्दाफाश केला. ही बाब दशमुखे यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. आशिष राऊत आणि विनय रोहणकर हे पेपर सेटिंगमध्ये सहभागी असल्याची शंका विद्यापीठाने वर्तविली आहे. याप्रकरणी आता चौकशी सुरू झाली असली तरी यातील वास्तव कधी पुढे येतील, याकडे नजरा लागल्या आहेत.संमतीचा तो कर्मचारी निलंबितवाशीम येथील संमती महाविद्यालयातील कर्मचारी बोरे याला आशिष राऊत याने प्रश्नपत्रिका पाठविल्याप्रकरणी विद्यापीठाने राऊत याची चौकशी सुरू केली असून, महाविद्यालयीन व्यवस्थापनाने बोरे याला निलंबित केल्याची माहिती आहे.पेपरफुटीत अनेकांचा हात?अभियांत्रिकीच्या मॅकेनिक्स विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणात अनेकांचा हात असल्याचे बोलले जात आहे. परीक्षा विभागाने महाविद्यालयाचे प्राचार्य, परीक्षा केंद्राचे सह अधिकारीदेखील अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दोनशे रुपये रोजंदारीवर श्रीमंतीचा थाटपरीक्षा विभागात दोन रुपये रोजंदारीवर कार्यरत आशिष राऊत, विनय रोहणकर या दोघे श्रीमंती थाटात वावरत असल्याने त्यांच्या बँक खात्याची चौकशी केल्यास बरीच सत्यता बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऑनलाइन प्रश्नपत्रिका वितरण प्रणालीत ऑनलाइन आर्थिक व्यवहारदेखील शोधणे हेदेखील विद्यापीठासमोर आव्हान आहे.याप्रकरणी द्विसदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. हे प्रकरण थेट पोलिसांत देण्याऐवजी विद्यापीठ स्तरावर योग्य शहानिशा करण्याच्या अनुषंगाने चौकशीचा निर्णय घेण्यात आला. चौकशी अहवालानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.- हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, संत गाडगेबाबा विद्यापीठ
अमरावती विद्यापीठात पेपरफुटीचे 'रॅकेट', खासगी कर्मचाऱ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 8:43 PM