लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: चोरीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी मिळावी, या मागणीसाठी हजर केलेल्या तीन महिलांनी न्यायालयात भोकांड पसरले. त्यांनी स्वत:कडील मुलांना जाणूनबुजून चिमटे काढून रडविले. न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण झाला. २ जून रोजी दुपारी ४.४५ च्या सुमारास न्यायालय क्रमांक १५ मध्ये ही घटना घडली.याप्रकरणी गाडगेनगर ठाण्यातील उपनिरीक्षक सचिन माकोडे यांच्या फिर्यादीवरून गाडगेनगर पोलिसांनी त्या तीन महिलांविरुद्ध भादंविचे कलम १८६ व बालन्याय अधिनियमाच्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल केला. त्या तीनही महिलांना सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करून बालकास क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली. आठवड्यापूर्वी गाडगेनगर पोलिसांनी बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्यात औरंगाबाद येथील तीन महिलांना अटक केली होती. त्यांना फिर्यादी महिलांनी ओळखले. पुढे न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी झाली. दरम्यान, २९ मे रोजी नोंदविलेल्या ३.७५ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी त्या तीनही महिलांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी क्रमांक १० यांच्या न्यायालयात करण्यात आली. त्यावर उपनिरीक्षक सचिन माकोडे यांची पेशी सुरू असताना पहिल्या महिला आरोपीने न्यायालयात हजर होताच तिच्या काखेत घेतलेल्या मुलाला स्वतः चिमटा घेऊन त्या मुलाला रडवले. न्यायालयीन कामकाजात सर्वांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.
सर्वांसमक्ष घडला प्रकारथोड्या वेळानंतर दुसऱ्या महिला आरोपीनेदेखील तिच्या काखेवरील बाळाला चिमटा घेऊन रडवले. त्यावेळी सरकारी वकील वासुकार यांनी तिला बघितले. तेथे त्यावेळी गाडगेनगर ठाण्याचे कोर्ट पैरवी कर्मचारी डोईजोड, आरोपीचे वकील, न्यायालयातील लिपिक, शिपाई आणि अन्य काही वकील होते. त्यांच्या समक्ष हा प्रकार घडला. पोलीस कोठडी मिळू नये, म्हणून तिन्ही महिला या कोर्टपेशी सुरू असताना रडायला लागल्या. त्यांनी न्यायालयीन कामकाजाला अटकाव केला तथा दोन महिला आरोपींनी स्वत:जवळील बालकांना क्रूरपणे वागणूक दिल्याची तक्रार पोलीस उपनिरीक्षक सचिन माकोडे यांनी नोंदविली.
न्यायालयीन पेशीदरम्यान तीनही महिला आरोपी रडल्या. पैकी दोघींनी स्वत:कडील मुलांना चिमटा घेऊन रडविले. तिघींनाही अटक करण्यात आली. ३.७५ लाखांच्या चोरीप्रकरणात त्यांचा पीसीआर मागण्यात आला होता.- आसाराम चोरमले, ठाणेदार, गाडगेनगर