परस्परविरोधी तक्रारी
धारणी : शहरातील सर्वे नं. १२६ मध्ये गुजरी बाजारातील मटण मार्केटमध्ये रविवारी सकाळी १० च्या दरम्यान दोन मटण विक्रेत्यांमध्ये ग्राहकाने दुचाकी दुकानासमोर उभी केल्याच्या कारणावरून वाद झाला. त्या वादात दोन्ही गटांतील पाच सहा सदस्यांनी लोखंडी रॉड, लाठी-काठ्यांनी मारहाण केली. त्यात एक जण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तेथील गर्दी पांगवली. ती गर्दी बाजारात धावत सुटल्याने बाहेरून आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
गुजरी बाजारातील मार्केटमध्ये मो. इम्रान मो. कलाम (२५, धारणी) व मो. जावेद मो. सादिक (२९) यांचे दुकान आहे. त्यातील एकाच्या दुकानाजवळ एका ग्राहकाने त्याची दुचाकी उभी केली. त्या कारणाने दोन्ही मांस विक्रेत्यांमध्ये वाद झाला. दोघांनी परस्परांना लोखंडी रॉड व लाठी-काठी घेऊन मारहाण केली. याबाबत मो. इम्रान मो. कलाम याने मो. साजिद मो. सादिक, शेख इब्राहिम, मो. वाजीद मो. सादिक यांच्याविरुद्ध शिवीगाळ व मारहाण केल्याची तकार दिली. मो. जावेद मो सादिक याच्या तक्रारीवरून मो. इम्रान मो. कलाम, अ. रशीद अ. मक्कू (रा. धारणी) यांच्याविरुद्ध तक्रार दिली.
पळापळ
धारणी शहरातही दुपारी १२ नंतर संचारबंदी लागणार असल्याने खेड्यापाड्यातील गरीब आदिवासी बांधव बाजार घेण्याकरिता आले होते. ते बाजार करीत असताना अचानक मटण विक्रेत्यांमध्ये वाद झाल्याने घटनास्थळी पोलीस पोहोचले. पोलिसानी गर्दी पंगविण्याचा प्रयत्न करताच पळापळ झाली. त्यामुळे गरीब आदिवासी बांधवांना बाजार न करता आल्यापावली परतावे लागले.