अमरावती : बडनेरा, अकोला मार्गावरील एका हॉटेलमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून येथील रूम क्रमांक २०७ मध्ये सुरू असलेल्या आयपीएल सट्ट्यावर धाड टाकून ७ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिसांनी रविवारी रात्री केली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस सूत्रानुसार, कैलाश संजय बसंतवानी (वय २५, रा. सिंधी कॅम्प वाशिम), जितेंद्र रामचंद्र धामानी (३७, ), देवेश रामप्रसाद तिवारी (३८, दोन्ही रा. आययुडीपी कॉलनी वाशिम), आशिष रामचंद्र सामानी (३८, रा. अकोला नाका जि. वाशिम ) असे आरोपीचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना बडनेरा मार्गावरील एका हॉटेलच्या रुममध्ये कलकत्ता नाईट रायडर विरुद्ध बंगळूरदरम्यान खेळल्या जाणाऱ्या आयपीएल क्रिकेटवर मोबाईल फोनच्या साहायाने बॅटींग करुन जुगार खेळल्या जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. सदर आरोपीकडून पोलिसांनी आयपीएल जुगार सट्टा खेळाचे १९,८०० रुपये नगदी, ६१ हजार रुपये किमतीचे विविध कंपनीचे १० मोबाईल फोन, ७ लाख रुपये किमतीची एमएच १२ आरके ४४४८ क्रमाकांची कार, १० हजारांचा एलसीडी, टीव्ही रिमोट कंट्रोल व इतर साहित्य असा एकूण ७ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादंविची कलम ४२०, ४६८,४७१,१८८,३४ अन्वये, सहकलम ४,५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम , सहकलम २५ (सी) भारतीय टेलीग्राम कायदा सहकलम ३,४ साथरोग अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला. आरोपींना २१ एप्रिलपर्यंत पीसीआर मिळाला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर, पीएसआय राजकिरण येवले, राजेश राठोड, अजय मिश्रा, निलेश जुनघरे, गजानन ढेवले, पोलीस कॉन्सटेबल चेतन कराळे आदींच्या पथकाने केली.
बॉक्स:
आठवड्याभरात दुसरी मोठी कारवाई
या आठवड्यात दोन ते ती दिवसांपूर्वी रविनगर येथे राजापेठ पोलिसांनी आयपीएल सट्टा पकडला होता. रविनगरचा अड्डा उद्ध्वस्त करून आरोपीला अटक केली होती. त्यानंतर आयपीएल बुकींनी नवी शक्कल लढविली. थेट हॉटेलमधीलच रूम रात्रभराकरिता भाड्याने घेवून हा सट्टा सुरू होता. गतवर्षीसुद्धा पोलिसांनी साईनगर परिसरात व ग्रामीण भागात आयपीएल सट्ट्यावर मोठी कारवाई करून सट्टा उघड केला होता. त्याचे नागपूर, अकोला, यवतमाळ कनेक्शन उघड झाले होते. आता वाशिम कनेक्शनसुद्धा समोर आले आहे.