अमरावती : राजापेठ पोलिसांनी रविनगरात सुरू असलेल्या आयपीएल क्रिक्रेटच्या सट्ट्यावर धाड टाकून एका बुकीसह दोघांना अटक केली. दोघे पसार झाले. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.
संदीप विनायक भुयारकर (४६, रा. रविनगर) आणि धीरज सुरेश भगत (३६ रा. विलासनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळाहून तीन मोबाईल, एक टीव्ही, डायऱ्या व १ लाख ५१ हजारांची रोख असा एकूण १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. गुप्त माहितीवरून पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात पीएसआय कृष्णा मापारी, पोलीस हवालदार दुल्लाराम देवकर, अतुल संभे, दानिश शेख, अमोल खंडेझोड, राहुल ढेंगेकर व विजय राऊत यांच्या पथकाने रविनगरातील रहिवासी संदीप भुयारकर याच्या घरी शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास धाड टाकली. त्यात मोबाईल व टीव्हीच्या माध्यमातून आयपीएलचा सट्टा खेळताना आढळून आले. पोलिसांनी संदीप भुयारकरसह तेथे उपस्थित धीरज भगतला अटक करून मुद्देमाल जप्त केला. चौकशीअंती या सट्ट्यात आणखी दोघांचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली. त्याआधारे पोलिसांनी रविनगरातील संस्कार वर्मा नामक तरुणाच्या घरावर धाड टाकली. परंतु पोलिसांचा सुगावा लागल्याने संस्कार वर्मासह त्याचा साथीदार लॅपटॉप व मोबाईल घेऊन पसार झाले. गतवर्षी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावती शहरातील आयपीएल सट्टा उघड केला होता. त्याचे अकोला व नागपूर कनेक्शन समोर आले होते. आताही आरोपीची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.