अमरावती : मध्य रेल्वेत एप्रिल ते डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मध्ये कार्यवाही, ६५५ मुले आणि ३०३ मुलींचा समावेश अमरावती : रेल्वे सुरक्षा बलाकडे (आरपीएफ) रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मुंबई मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत एप्रिल ते डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सरकारी रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६५५ मुले आणि ३०३ मुलींसह ९५८ मुलांची मध्य रेल्वेच्या फलाटांवरून सुटका केली आहे. यामध्ये चाइल्डलाइन स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या बालकांचे त्यांच्या पालकांशी पुनर्भेट घडवून आणली, हे विशेष.
काही मुले शुल्लक कारण, भांडण, कौटुंबिक समस्या अथवा उच्च चांगल्या जीवन पद्धती किंवा मोठ्या शहराचे ग्लॅमर आदींच्याशोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता घरून निघून जातात. किंबहुना रेल्वेस्थानकावर येणारी ही मुले प्रशिक्षित असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या निदर्शनास येतात. तेव्हा हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. या उपक्रमातून गत दहा महिन्यांत मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या आरपीएफने भरीव कामगिरी करीत ९५८ मुलांची सुटका करून त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. आरपीएफचे हे कार्य निरंतरपणे सुरू आहे.
अशाप्रकारे गत दहा महिन्यांत झाली मुलांची सुटकामुंबई विभाग : २८९ (१७५ मुले, ११४ मुली)भुसावळ विभाग : २७० (१६९ मुले, १०१ मुली)पुणे विभाग : २०६ (१९८ मुले, ८ मुली)नागपूर विभाग : १३२ (७६ मुले, ५६ मुली)सोलापूर विभाग : ६१ ( ३७ मुले, २४ मुली)
मध्य रेल्वेच्या आरपीएफने जानेवारी २०२४ मध्ये ३५ मुले आणि २१ मुलींसह ५६ मुलांची सुटका केली आहे. त्यापैकी एकट्या मुंबई विभागात २७ मुलांची सुटका करण्यात आली आहे. गत दहा महिन्यांत सर्वाधिक मुंबई विभागाने २८९ मुलांची सुटका करून त्यांना त्याच्या पालकांच्या स्वाधीन सुखरूप केले आहे.- मोहित पांडे, जनसंपर्क अधिकारी, मुंबई मध्य रेल्वे