गणेश वासनिकअमरावती : नजीकच्या वलगाव रेल्वे फाटकाजवळ नरखेड येथे रेल्वे ट्रॅक तुटल्याची घटना शनिवारी सकाळी १२.१० वाजता दरम्यान निदर्शनास आली. मालगाडी गेल्यानंतर ही घटना घडल्यानंतर रेल्वे ट्रॅक तुटला, अन्यथा मोठ्या अपघाताच्या सामोरे रेल्वे प्रशासनाला जावे लागले असते, या घटनेमुळे दोन मेमू ट्रेनचे वेळापत्रक कोलमडले, हे विशेष.
वलगाव रेल्वे फाटकाजवळ ट्रॅक तुटल्याची बाब नरखेड रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीतील गार्डच्या निदर्शनात आली. ही माहिती गार्डने वलगाव रेल्वे प्रबंधकाला कळविली. ट्रॅक तुटल्याने पुढे अप्रिय घटना घडू नये, यासाठी वलगाव रेल्वे स्थानकाचे प्रबंधकांनी बडनेरा रेल्वे लोकोफोरमन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तासाभराने तुटलेल्या ट्रॅकचे काम युद्धस्तरावर सुरू झाले. प्राथमिक स्तरावर तुटलेल्या ट्रॅकची दुरूस्ती झाल्यानंतर भुसावळ -नरखेड आणि नरखेड - भुसावळ या दोन्ही मेमू ट्रेनला अडीच तासांनंतर पुढे सोडण्यात आल्याची माहिती आहे. मेमू ट्रेन गेल्यानंतरही तुटलेल्या ट्रॅकचे काम सुरूच होते, असे एका रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.रेल्वे ट्रॅकचे झाले दोन तुकडे
नरखेड मार्गावरून मालगाडी गेल्यानंतर वलगाव फाटकाजवळ रेल्वे ट्रॅक तुटलेला असल्याची माहिती मालगाडीतील गार्डने वलगाव रेल्वे स्टेशन प्रबंधकांना दिली. रेल्वे ट्रॅकचे दोन तुकडे झाल्यामुळे पुढे प्रवासी गाडी गेल्यास मोठी जीवितहानी होईल, ही बाब गार्डच्या लक्षात आली. लागलीच रेल्वे प्रशासनाने काही वेळाने बडनेरा येथील रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर पाच तास ट्रॅक दुरूस्तीचे काम सुरूच होते. ट्रॅक दुरूस्तीपर्यंत मेमूमधील प्रवाशांना प्रतीक्षा
नरखेड मार्गावर वलगाव येथे रेल्वे ट्रॅक तुटल्याने थांबविण्यात आलेल्या दोन मेमू ट्रेनमधील प्रवाशांना पुढे प्रवास करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. प्राथमिक स्वरूपात ट्रॅक दुरूस्ती होईस्तोवर अडीच तासांपर्यंत मेमू ट्रेन थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना वलगाव परिसरात नरखेड रेल्वे मार्गावरच मेमू ट्रेनमध्ये थांबावे लागले.