मुंबईसाठी आरक्षण मिळेना : लग्नसराईची धूम, उन्हाळ्यात सुटीचे नियोजनअमरावती : जेमतेम लग्नसराई, परीक्षांना प्रारंभ झाला आहे. शाळा, महाविद्यालयांच्या सुट्यांमध्ये मौजमस्ती, नातेवाईकांकडे जाण्याचे नियोजन अनेकांनी चालविले आहे. त्यामुळे मार्च ते जून हे चार महिने रेल्वे गाड्यांमध्ये नो-आरक्षण असे फलक आतापासून झळकू लागले आहेत. मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असे चित्र आहे.प्रवाशांचा रेल्वे गाड्यांत सुकर प्रवास व्हावा, यासाठी यंदा हॉलीडे स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र 'मुंबईकडे ये-जा करण्यासाठी जूनपर्यंत गाड्यांमध्ये आरक्षण हाऊसफुल्ल' असे फलक झळक त आहेत. तसेच दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद, पुणे, हावडा मार्गे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण होणार आहे. शनिवारी २५ फेब्रुवारीपासून काही हॉलीडे स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यात नागपूर - मडगाव, नागपूर- कुर्ला, मुंबई- नागपूर, नागपूर- पुणे, मुंबई - नागपूर अशा आठ फेऱ्या शनिवार, रविवार व शुक्रवार या तीन दिवशी सुरू करण्यात आल्या आहेत. मार्च महिना प्रारंभ होताच रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळविण्यासाठी एकच झुंबड उडते. विशेषत: मुंबई, पुणेकडे ये-जा करताना शाळा, महाविद्यालयांना लागणाऱ्या सुट्यानुसार रेल्वे गाड्यांचे आरक्षण केले जाते. मात्र पुढील तीन महिने रेल्वेचे आरक्षण मिळविण्यासाठी प्रवाशांना आतापासून रस्सीखेच करावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच तिरुपती देवस्थानात दर्शनासाठीसुद्धा रेल्वेने ये - जा करणे भाविक पसंती देतात. मात्र उन्हाळ्यात तीन महिने अमरावती- तिरुपती, अहमदाबाद- चैन्नई एक्सप्रेसमध्ये आरक्षणाची मागणी वाढू लागली आहे. नागपूर- पुणे गरीब रथ, अमरावती- मुंबई एक्सप्रेस या गाड्यांना प्रवाशांची सर्वांधिक पसंती असून जूनपर्यंत आरक्षण नाही, अशी आॅनलाईन माहिती मिळत आहे. पुणे, मुंबईकडे ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यामार्गे ये - जा करणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणासाठी प्रवाशांची मागणी जास्त आहे. रेल्वे गाड्यात ‘नो - आरक्षण’ हे झळकत असलेले तिकीट खिडक्यांवरील फलक प्रवाशांसाठी येत्या तीन महिन्यांत डोकेदुखी ठरणारे आहे. (प्रतिनिधी)पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आरक्षणाची स्थिती कठीण दिसत आहे. मुंबईसाठी तीन महिने आरक्षण हाऊसफुल्ल आहे. हॉलिडे स्पेशल गाड्या सुरू झाल्या असून काही अंशी प्रवाशांचा ताण दूर होईल.- डी. व्ही. धकाते,मुख्य आरक्षण पर्यवेक्षक, अमरावती रेल्वे स्थानक
रेल्वे गाड्या ‘हाऊसफुल्ल’
By admin | Published: February 28, 2017 12:16 AM