लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या सार्वत्रिक पावसाने साधारण १२३३ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव, अचलपूर, चिखलदरा, दर्यापूर व चांदूर बाजार तालुक्यात तूर, कपाशी व सोयाबीनचे नुकसान झालेले आहे. शिवाय नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे काठालगतची ४३० हेक्टर शेती खरडून गेली आहे.
यामध्ये सर्वाधिक ५९५ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले आहे. अमरावती तालुक्यात ८९ हेक्टर, धामणगाव ५० हेक्टर, चिखलदरा २० हेक्टर व चांदूर बाजार तालुक्यात ४६ हेक्टरचा समावेश आहे. शिवाय १४७ हेक्टरमधील कपाशी, ५८ हेक्टरमध्ये तूर, ४ हेक्टरमध्ये ज्वारी, १ हेक्टर मका पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
अमरावती तालुक्यात १५८ हेक्टर, चांदूर रेल्वे ३५, धामणगाव ९५, अचलपूर ४३०, चिखलदरा ४८, दर्यापूर ३५५ व चांदूर बाजार तालुक्यात ११० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. या आपत्तीमध्ये अचलपूर तालुक्यातील ४३० हेक्टर शेती खरडून गेली आहे. या बाधित क्षेत्राचे पंचनामे अद्याप सरु नसल्याची माहिती आहे.
पाच मंडळांमध्ये मुसळधारअमरावती: आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. या दरम्यान २४ तासात जिल्ह्यात सरासरी २०.९ मिमी पावसाची नोंद झाली. मेळघाटासह मोर्शी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. आतापर्यंत सर्वात कमी पाऊस झालेल्या धुळघाट मंडळात पहिल्यांदा दमदार पावसाची नोंद झाली. या मंडळात ६५ मिमी सादाबर्डी ६५ मिमी, चिखलदरा ७६.३ मिमी, शिरखेड ७१.८ मिमी व रिद्धपूर मंडळात ६६ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात १२ जून रोजी मान्सून दाखल झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत २८ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३४२.६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३२२.२ मिमी पाऊस झालेला आहे. ही ९४ टक्केवारी आहे. या आठवड्यात पावसाची आकडेवारी वाढली असली तरी अद्याप धारणी, चिखलदरा, अमरावती, भातकुली, मोर्शी व अचलपूर तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही.
दोन व्यक्तींचा मृत्यूः १४ जनावरे मृत ११ ते २२ जुलैदरम्यान लालखडी येथील परवेज खान (१२) व ब्राह्मणवाडा भगत येथील अशोक राहाटे (३०) हे दोन व्यक्त्तीपुरात वाहून गेल्याने मृत झाले, तर १३ लहान व १ मोठे अशा १४ गुरांचा मृत्यू झाला आहे. सततचा पावसाने ११ तालुक्यांतील ६२ घरांची पडझड झाल्याचा महसूल यंत्रणेचा प्राथमिक अहवाल आहे.
घराची भिंत कोसळून चौघे जखमीधामणगाव रेल्वे : तालुक्यासह शहरात पावसाची रिपरिप गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान शहरातील टिळक चौकाजवळील एका राहत्या घराची भिंत कोसळून चौघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. टिळक चौकाजवळील मार्गावर दिलीप सुलताने यांचे घर आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांची दोन्ही मुले ही शाळेत जाण्याची तयारी करत होते. तर महिला आणि दिलीप सुलताने हे घरात असताना अचानक घराची भिंत अंगावर पडली. भिंत कोसळल्याच्या मोठ्या आवाजाने परिसरातील अशोक कुचेरिया, बालू यादव, करण उपाध्याय व इतर नागरिक आपल्या घराबाहेर पडले.
महसूल विभागाकडून संपाचा बाऊसध्या महसूल विभागात वर्ग ३ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. याचा बाऊ महसूल विभाग करीत आहे. प्रत्यक्षात बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे, सर्वेक्षण हे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक करतात. त्यामुळे नुकसानीचा प्राथमिक अहवाल व सर्वेक्षण याचा आंदोलनाशी संबंध येत नाही. तरीही तालुकास्तरावर महसूल अधिकाऱ्यांनी अधिनस्त यंत्रणेला सर्वेक्षणाचे आदेश दिले नसल्याची माहिती आहे.