अमरावती : शहरात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास पावसाची तासभर बॅटिंग सुरू होती. या दमदार पावसाने नाल्या तुंबल्या व नाले ओव्हर फ्लो झाल्याने काठालगतच्या घरात पाणी शिरले. नाल्याला अचानक आलेल्या पुरामुळे लालखेडी येथील १२ वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची घटना घडली. ग्रामीणमधील अनेक भागात पावसाची नोंद झाली.
शहरात खोलगट भागात असलेल्या वस्त्यांमध्ये व अंबा नाल्याकाठच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तारांबळ उडाली व गृहोपयोगी साहित्य भिजले. सागरनगर, जावेदनगर, सादीयानगर, सुफियाननगर, आदी भागातील अनेक घरांत पावसाचे व नाल्याचे पाणी घुसल्याने नागरिकांची अडचण वाढली आहे. याच परिसरातील लालखेडी येथे १२ वर्षांचा मुलगा पावसाच्या पाण्यात खेळत असताना नाल्याच्या पाण्याचा लोंढा आल्याने वाहून गेल्याची घटना घडली.
जिल्हा शोध व बचाव पथकाद्वारा मुलाचा शोध घेण्यात येत आहे. जिल्ह्याच्या इतर भागातही पावसाने दणका दिला. पिकांना व पेरणी झालेल्या भागासाठी हा पाऊस पोषक ठरला आहे. सध्याचे हवामान पावसाला पोषक असून, १६ तारखेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याचे आयएमडीद्वारा सांगण्यात आले.