यंदा विक्रमी ४९२ टक्के क्षेत्र : ७० हजार एकरांत उडीद काढणीला ‘ब्रेक’अमरावती : परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम सोयाबीन, तूर, कपाशीला पोषक असला तरी उडीद पिकाच्या मुळावर उठला आहे. यंदा उडीद पिकाचे विक्रमी क्षेत्र आहे. सततच्या पावसामुळे उडदाच्या सवंगणीला ब्रेक लागल्याने पीक करपत आहे. ज्यांची सवंगणी करून ढीग लागले आहे, तेथे शेंगामधील दाने अंकुरत आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासून समाधानकारक पाऊस असल्याने जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या ४९२ टक्के म्हणजेच १३ हजार एकरांच्या तुलनेत ७० हजार हेक्टरमध्ये उडदाची पेरणी झालेली आहे. ६२ ते ८० दिवसांचे हे उडदाचे पीक नगदी पीक म्हणून जिल्ह्याच्या सर्वच भागांत घेण्यात येते. मात्र दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यात या पिकाचे पेरणीक्षेत्र अधिक आहे व या भागात परतीचा पाऊसदेखील अधिक झाल्यामुळे उडदाचे पीक शेतातच खराब होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सवंगणी करून ढीग लावले ते पावसात भिजून काळे पडत आहे. काही ठिकाणी शेंगांमधील दाण्याचे अंकुरण होत आहे व बियाण्यांची प्रतवारी खराब होत आहे व या सर्व प्रकारात सरासरी उत्पन्नात २५ ते ३० टक्क्यांनी घट होणार आहे. शेतकरी पाऊस उघडण्याची वाट पाहत असून नंतर उडीद पीक सवंगणीला वेग येणार आहे. गतवर्षी १२ हजार, यंदा ७ हजार भाव मागील वर्षी मान्सूनचे उशिरा आगमन व नंतर पावसाची प्रदीर्घ दडी यामुळे उडीद पिकाचे क्षेत्र कमी झाले. जेथे पेरणी केली, त्या ठिकाणी मोड येऊन दुबार पेरणीद्वारे सोयाबीन पेरावे लागले होते. उत्पादन नसल्यामुळे उडदाला १२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा उडदाची विक्रमी अशी पेरणी झाली. त्यामुळे उडदाचा हंगाम सुरू होताच व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहे. त्यामुळे सध्या ७ हजार ते ७ हजार २०० रुपये असा भाव मिळत आहे. दर्यापूर, अंजनगाव तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र जिल्ह्यात यंदा २८ हजार क्षेत्रात उडदाची पेरणी झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक १०,६९१ हेक्टर क्षेत्र दर्यापूर तालुक्यात आहे. अंजनगाव सुर्जी ५,५०६, अचलपूर ८६९, चांदूरबाजार १,५६०, धामणगाव रेल्वे १,२९४, चांदूररेल्वे १९६, तिवसा ६६४, मोर्शी ६८७, वरुड ३९८, धारणी १,९२०, चिखलदरा ३३५, अमरावती ६७४, भातकुली २,९८२, नांदगाव खंडेश्वर ७६९ हेक्टर क्षेत्रात उडीद पीक आहे. कृषी सहायकांमार्फत पंचनामे करावे परतीच्या पावसामुळे उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याची सूचना कृषी कार्यालयास देणे महत्त्वाचे आहे व कृषी सहायकांमार्फत पंचनामे करावे, हा अहवाल पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी उपयुक्त ठरणार आहे. सध्या वातावरणात आर्द्रता व पाऊस जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कडक ऊन पडण्याची वाट पाहावी, ज्यांनी सोंगणी केली त्यांनी ढिग झाकून ठेवावे व उन्हात सोकवावे. - योगेश इंगळे, कृषी शास्त्रज्ञप्रादेशिक संशोधन केंद्र
परतीचा पाऊस उडदाच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2016 12:21 AM