धारणी, दि. 26-मागील दोन महिन्यांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मेळघाटवासीयांना गणरायांच्या आगमनासोबतच पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला. तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मेळघाटातील नदी-नाले वाहू लागले आहेत.अमरावती विभागात दरवर्षी सर्वाधिक पाऊस मेळघाटात होतो. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्यामुळे नदी नाले ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत कोरडेच होते. यामुळे शेतकऱ्यांमध्येदेखील चिंतेचे वातावरण होते. काही शेतकऱ्यांनी ओलीत करण्यास सुरुवात केली होती. यंदा दुष्काळाचे सावट परसणार का, अशी चिंता लागली असतानाच गणरायाच्या आगमणासोबतच पावसाने दमदार हजेरी लावल्याने मेळघाटात आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय मेळघाटात असलेल्या प्रचंड उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील तापी, सिपना, गडगा, मधवा व अलई या नदी-नाल्यांना पाणी आले आहे.
पावसाच्या पुनरागमनाने धारणी तालुक्यातील पिकांना संजीवनी मिळाली असून खरीप हंगाम वाया जाणार नाही, अशी उमेद शेतकऱ्यांमध्ये आहे. हा पाऊस किमान १५ दिवस राहिल्यास जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल, असा अंदाज स्थानिक लावत आहेत. तूर्तास पाण्याचे दुर्भिक्ष संपले असले तरी रबी हंगामासाठी दमदार पाऊस पडायलाच हवा, असे मत व्यक्त केले जात आहे