फोटो - अंजनसिंगी ०९ पी
यवतमाळ-रिद्धपूर रस्त्याचे काम अपूर्ण
अंजनसिंगी : पावसाळ्यातील पहिला पाऊस अंजनसिंगी गावाला चिंब करून गेला. एवढेच नव्हे तर यवतमाळ-रिद्धपूर रस्त्याच्या अपूर्ण नाल्यांमुळे पावसाचे पाणी थेट घरोघरी शिरले.
अंजनसिंगी येथे यवतमाळ रिद्धपूर रस्त्याचे काम सुरू आहे. सदर रस्त्याच्या कडेच्या नालीचे बांधकाम अद्याप झाले नसल्यामुळे आठवडी बाजार परिसरात कोसळलेले संपूर्ण पाणी मंगळवारी रस्त्याला अ़डून थेट गावातील नाल्यामार्फत लोकांच्या घरामध्ये घुसले.
एक महिन्यापासून धीम्या गतीने रस्त्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमित जागा रिकाम्या न केल्याने बांधकाम अर्ध्यावर थांबलेले आहे. ज्या नागरिकांची घरे रस्त्यात येतात, त्या नागरिकांना त्यांच्या जागेचा मोबदला मिळावा, अशी मागणी आहे. जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग जागा मोकळी करून देत नाही, तोपर्यंत रस्त्याचे बांधकाम होणार नाही, असा कंत्राटदाराचा पवित्रा आहे. मात्र, यामुळे मंगळवारी पावसाचे वाहून येणारे पाणी सरळ गावात लोकांच्या घरात शिरले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम तातडीने पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.