अमरावती, दि. 11 - वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ५६ टक्के झालेली पावसाची नोंद आणि अप्पर वर्धा प्रकल्पातील मर्यादित पाणीसाठ्याचा पहिला फटका अमरावती शहराला बसला आहे. ७ लाख लोकसंख्येच्या महानगराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला असून त्याची अंमलबजावणी ११ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी महानगरातील १७ जलकुंभांना दोन झोनमध्ये विभागण्यात आले आहेत.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत ८१४.५ मी.मी. पाऊस अपेक्षित असतो. मात्र, या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ५६.४ टक्के अर्थात ४५९ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. कमी पर्जन्यमानामुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया आणि जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या अप्परवर्धा प्रकल्पातील पाण्याची पातळी कमी आहे. अप्पर वर्धा धरणात पिण्याच्या पाण्याकरिता ५८ दलघमी वार्षिक मंजूर आरक्षण आहे. सन २०१७-१८ मध्ये ते ४४ दलघमी असे निश्चित करण्यात आले आहे. शहराच्या सध्याच्या ७ लाख लोकसंख्येस प्रतिदिन १३५ प्रतिलीटरप्रमाणे १२७ दशलक्ष लीटर्स पाणी हवे आहे. तूर्तास ९५ दशलक्ष मीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून ११५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. सध्या शहरात सुरू असलेला पाणीपुरवठा अप्परवर्धा प्रकल्पातून २४ तास पंपिंगद्वारे सुरू आहे. प्रकल्पाची पातळी कमी झाल्यास पंपाची उपसाक्षमता कमी होईल, असे निरीक्षण मजीप्राने नोंदविले आहे. याशिवाय अमृत योजनेमधील कामे पूर्ण होईपर्यंत शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मजिप्राने घेतला आहे. तसा पत्रव्यवहार महापालिकेशी करण्यात आला आहे. अमृत योजनेमधील कामाची कुर्मगती आणि अप्पर वर्धा प्रकल्पातील मर्यादित जलसाठा लक्षात घेऊन अमरावती शहराला ११ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
अप्पर वर्धा प्रकल्पातील मर्यादित जलसाठा, सिंभोरा येथून होणा-या पंपिंगमध्ये खंडित वीजपुरवठयाचा अडसर आणि अमृत योजनेतील कामांमुळे महानगराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाची अंमलबजावणी ११ सप्टेंबरपासून करण्यात आली.- सुरेंद्र कोपुलवार, कार्यकारी अभियंता, मजीप्रा, अमरावती
महापालिका क्षेत्रात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मजीप्राने महापालिका प्रशासनाला कळविला आहे. त्यानुसार महानगरातील जलकुंभांचे दोन झोनमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून झोन क्रमांक १ मध्ये सोमवारी तर झोन क्रमांक २ मध्ये मंगळवारी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.- हेमंत पवार, आयुक्त, महापालिका