लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील २४ तासांत पावसाची रिपरीप सुरू आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक २७.५ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ५३ मिमी पाऊस वरूड तालुक्यात पडला. या रिमझीम पावसाने शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने जिल्ह्यासह विभागात पुढील दोन दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.जिल्ह्यात १ जून ते ३० आॅगस्ट या कालावधीत ८१४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४३७.४ मिमी पाऊस पडला आहे. ही ६८.९ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच तारखेत ७५४.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. आतापर्यंत अमरावती तालुक्यात ३७६.२ मिमी, भातकुली ३५९.६, नांदगाव ४०४.४, चांदूररेल्वे ४७६.५, धामणगाव ३९१.८, तिवसा ४५९.८, मोर्शी ४६३.६, वरूड ५४४, अचलपूर ३१५.१, चांदूरबाजार ३८८.६, दर्यापूर ३३५.५, अंजनगाव सुर्जी २५४.१, धारणी ५५८७.९ व चिखलदरा तालुक्यात ७६६ मिमी पाऊस पडला आहे. पावसाच्या सरासरीत सर्वाधिक ८०.७ टक्के पाऊस चांदूररेल्वे तालुक्यात, तर कमी ५२.९ टक्के पाऊस अंजनगाव सुर्जी तालुक्यात पडला आहे.जिल्ह्यात अद्याप एकाही तालुक्याने पावसाची सरासरी गाठलेली नाही. धरणक्षेत्रातदेखील पाऊस नसल्याने प्रकल्पांच्या पातळीत वाढ झालेली नाही.मागील तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: अचलपूर उपविभागातील तीन तालुक्यांतील पिकांना संजीवनी मिळाली आहे. अचलपूर, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यांना पावसामुळे सर्वाधिक फायदा होणार आहे. चांदूर बाजार व मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना याचा फायदा होईल. वरूड तालुक्यातील संत्राबागांना मृग बहरासाठी हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे. यंदा सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. सोयाबीन फुलावर असल्यामुळे हा पाऊस या पिकासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. येत्या काही दिवसांत आणखी पाऊस आल्यास सोयाबीनचे भरगोस उत्पादन होईल. कपाशीसाठीदेखील आलेला पाऊस महत्त्वाचा ठरला आहे.