अमरावती : शहराला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे शहरात सर्व रस्त्यावर तसेच खोलगट भागात असेलेले अनेक मार्केटमध्ये पाणीच -पाणी होते. राजकमल चौकातील मुख्य मार्केटमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने यामध्ये अनेक व्यावसायिकांचे किरकोळ नुकसान झाले. गुरुवारी सकाळपर्यंत पावसाचे पाणी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती.
शहरात अनेक मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट काँक्रेटिकरणाचे रस्ते बांधले. मात्र, अनेक मोठ्या नाल्यांचे कामे प्रलंबित आहे. तसेच महापालिकेनेसुद्धा पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ व कचरा काढायला हवा होता तो काढला नाही. त्यामुळे नाल्या ब्लॉक झाल्याने पावसाचे पाणी वाहून न जाता ज्या ठिकाणी खोलगट भागात मार्केट आहेत त्यात ते पाणी शिरले. त्यामुळे राजकमल चौकातील मुख्य मार्केटमधील मोेबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकाने, आईस्क्रीम सेंटर तसेच अनेक व्यावसायिकांना गुरुवारी दुपारपर्यंत दुकाने उघडण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यांनी फिर्याद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे नोंदविली. मात्र, नाल्यांची कामे झाल्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली हे विशेष! नालीचे कामे करताना काही डीबी बॉक्स काढून ते दुसरीकडे हलविणे गरजेचे होते. तसेच पत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाने महावितरणला दिले मात्र डीबी बॉक्स न काढल्याने बांधकाम विभागाला मुख्य नाली जोडता आली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी मार्केटमध्ये शिरल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.