अमरावती : जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने जनमानस हैराण झाले आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट असतानाच हवामान खात्याने मात्र खुशखबर दिली असून येत्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शनिवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरूवात होऊ शकते. जुलै महिन्यात सरासरी पर्जन्यमान राहणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.यंदा उन्हाळ्यातील तापमानाने ४६ डीग्री सेल्सिअसपर्यंत उच्चांक गाठला होता. उन्हाच्या तीव्रतेमुळे यंदा पर्जन्यमानही चांगलेच राहील, असा सगळ्यांचा कयास होता. मात्र, यंदा पावसाची सरासरी कमी राहणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. नाही म्हणायला जून महिन्यात काही दिवस ढगाळ वातावरणामुळे पावसाच्या आगमनाची चाहुल लागली होती. मध्यंतरी तुरळक पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसुद्धा केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी दिली. आता मात्र महाराष्ट्र ते केरळ व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनसाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शनिवारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस कमी-अधिक असू शकतो.
लवकरच बरसणार पावसाच्या सरी!
By admin | Published: July 05, 2014 12:24 AM