अमरावती: शासन स्तरावर जून ते सप्टेंबर यादरम्यानची चार महिने पावसाळा गृहित धरण्यात येतो. यादरम्यान सर्व तालुक्यांत २४ बाय ७ सर्व नियंत्रण कक्ष सुरू राहतात. त्यानुसार ३० सप्टेंबरपासून पावसाळा हा संपलेला आहे. जिल्ह्यात अद्याप ३१ टक्के पावसाची तूट कायम आहे. यामध्ये चांदूर बाजार वगळता, उर्वरित १३ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत.
जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ८६२ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५९७.८ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही ६९.४ टक्केवारी आहे. यामध्ये केवळ चांदूर बाजार तालुक्याने पावसाची सरासरी पार केलेली आहे. उर्वरित १३ तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली, तर पाच तालुक्यांत ५० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे सावट कायम आहे. सोबतच जमिनीत आर्द्रता कमी असल्याने रब्बी हंगामाची चिंता वाढली आहे.र ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड राहिल्याने पिकांची वाढ खुंटून सोयाबीनचा बहर गळाला, तर मूग, उडीद पिके पावसाअभावी बाद झाले.तालुकानिहाय पाऊस (टक्केवारी)
धारणी ५८.१, चिखलदरा ८३.७, अमरावती ६६.७, भातकुली ६७.८, नांदगाव ८४.९, चांदूर रेल्वे ८४.४, तिवसा ९६.१, मोर्शी ८७.४, वरूड ९८.५, दर्यापूर ५४.८, अंजनगाव सुर्जी ६४.४, अचलपूर ५६.९, चांदूर बाजार ११०.८, धामणगाव ७६.८