अमरावती : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे. ईशान्य मध्यप्रदेशच्या ४.५ किमी उंचीवर चक्राकार वारे आहेत. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून ते ओडिशा किनारपट्टीवर पोहचण्याची शक्यता असल्याचे पावसाचा मुक्काम जिल्ह्यासह विदर्भात किमान एक आठवडा वाढला आहे.
या परिस्थितीमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात २७ ते २९ तारखेदरम्यान हलका ते मध्यम पाऊस राहील. २७ ला अकोला व अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासह बुलडाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार व गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. २८ ला अमरावती व गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. २९ ला अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाची रिपरीप ही २ ऑक्टोबरपर्यंत राहणार असल्याची माहिती हवामानतज्ञ अनिल बंड यांनी दिली.
दरम्यान, आता सोयाबीनचा हंगाम सुरू झाल्याने पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतात पाणी साचल्याने सवंगणी होत नाही. काही भागात सोयाबीनच्या झाडावरील शेंगांना कोंब फुटत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाची अशीच स्थिती कायम राहिल्यास मागील वर्षीप्रमाणे यंदाचे सोयाबीन हातचे जाण्याची शक्यता आहे. याशिवाय कपाशीवर बोंडसड होण्याची शक्यता आहे.
बॉक्स
‘गुलाब’ वादळामुळे पुन्हा पाऊस
उत्तर बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार झाले आहे. हे ’गुलाब’ वादळ आंध्रप्रदेश-ओडिशा किणारपट्टीवर पोहचण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. या वादळाची वाटचाल पश्चिम-वायव्य दिशेने व छत्तीसगड, तेलंगणा मार्गाने विदर्भाकडे होण्याची शक्यता आहे. जमिनीवर पोहचल्यावर या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. या वादळाच्या प्रभावामुळे विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.