परतवाडा : केंद्र व राज्य शासनाच्या धर्तीवर अंगणवाडी व मदतनीस यांच्या पदाकरिता वयोमर्यादा ३७ वर्षे करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी रिपब्लिकन एकता मंचतर्फे पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर व शासनाला निवेदनाद्वारे केली.
अंगणवाडी सेविका व मदतनिसांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मानधन प्राप्त होते. एकदा सेवेत घेतलेली अंगणवाडी सेविका असो वा मदतनीस, ती वयाची विशिष्ट मर्यादा पूर्ण करेपर्यंत पदावर कार्यरत असते. त्यांची निवडसुद्धा विशिष्ट चाकोरीतूनच पार पडते. या पदांना लागणारे शैक्षणिक निकष वेगळे असले तरी उच्चशिक्षण घेतलेल्या उमेदवाराला त्यांच्या गुणवत्तेवर जादा गुण मिळतात. तथापि, उच्च शिक्षण घेण्याकरिता वयाचा बराचसा कालावधी निघून जातो आणि उच्चशिक्षित मागासवर्गीय व मागास जमातीतील स्त्रिया यांना उच्च शिक्षण घेऊनही ग्रामीण भागात राहावे लागते. केंद्राने ही स्थिती डोळ्यांपुढे ठेवून ३५ वर्षे मर्यादा ठेवली होती. राज्य शासनाने ३२ वर्षांपर्यंत शिथिलता दिली आहे. त्यामुळे ही वयोमर्यादा सरसकट ३७ वर्षे करण्याची मागणी प्रताप अभ्यंकर यांनी केली आहे.
बॉक्स
आंदोलनाचा इशारा
देशभरातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. असे न झाल्यास महाराष्ट्र शासनाविरुद्ध रिपब्लिकन एकता मंच, अमरावती जिल्हा व भारतीय जनता पार्टी आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर व सदस्यांनी ना. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदींना दिले आहे
-------------------------------------------