अमरावती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा चौथा दिवस असून ते अमरावती जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आज त्यांनी गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे त्यांनी दर्शन घेतले.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे अमरावती दौऱ्यावर आहेत. नागपूर, चंद्रपूर दौऱ्यानंतर ते अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मिशन विदर्भ अंतर्गत विदर्भात मनसे पक्ष वाढ आणि पक्ष संघटना बळकटीसाठी त्यांच्या दौरा महत्वाचा मानला जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन पक्ष बळकटीसाठी मार्गदर्शन करणार आहेत.
राज ठाकरे हे मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता अमरावती शहरात दाखल झाले. यावेळी पंचवटी चौक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम होता. बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास राज ठाकरे यांनी गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळाचे दर्शन घेतले.
त्यानंतर नागपूर महामार्गावरील तळेगाव श्यामजी पंत येथे साकारला जाणाऱ्या क्रिकेट स्टेडियमच्या पाहणीकरिता गेले आहेत. रोमी भिंडर यांच्याकडून ते क्रिकेट स्टेडियमबाबत माहिती घेणार असून, पाहणी करून पुन्हा अमरावती येथे परत येऊन मनसेच्या अमरावती विभागीय पदाधिकारी मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ठाकरे मुंबइकडे रवाना होतील.