अतिक्रमणाचा विळखा : महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष
परतवाडा : अचलपूरच्या तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान म्हणून ओळख असलेले ‘राजगृह’ त्यांच्या प्रतीक्षेत ओस पडले आहे. तहसीलदार मदन जाधव अचलपूरला रुजू झाले तरी हे शासकीय निवासस्थान रिक्त आहे.
शासकीय निवासस्थानी अत्यावश्यक अशा काही दुरुस्त्या तहसीलदारांना अपेक्षित होत्या. अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या दुरुस्त्या, बंगल्याची रंगरंगोटी, नव्या सिलिंगची निर्मिती आणि आवश्यक ती कामे तीन महिन्यांपूर्वी पूर्णत्वास नेली गेली. यावर जवळपास १३ लाख रुपये खर्च केले गेले. पण, तहसीलदार अजूनही या सुसज्ज अशा शासकीय निवासस्थानी परतले नाहीत.
तहसीलदारांच्या प्रतीक्षेतील या राजगृहाला एक इतिहास आहे. ब्रिटिशांचा वारसा या वास्तूला लाभला आहे. प्रशस्त अशा मोकळ्या जागेतील राजगृह तालुक्याचे नव्हे, तर राजस्व विभागाचे वैभव आहे. अचलपूर तहसील अस्तित्वात आल्यापासून रुजू होणाऱ्या प्रत्येक तहसीलदाराचे वास्तव्य याच राजगृही राहिले आहे. ते दीर्घकाळ यापूर्वी कधीच रिकामे राहिले नव्हते. ते अचलपूरच्या तहसीलदारांची ओळख ठरली आहे.
पाळीव पशूंकडून फेरफटका
रंगरंगोटीने सज्ज अशा तहसीलदारांच्या प्रतीक्षेतील या शासकीय निवासस्थानात आज बकऱ्या, कुत्रे, व पाळीव जनावरे फेरफटका मारत आहेत. बंगल्यातील मोठमोठ्या कडुनिंबाच्या वृक्षांच्या सावलीत ते पहुडतात. एरवी या बंगल्यात जाण्यास दहावेळा विचार करणारेही मनसोक्तपणे त्या बंगल्याच्या आवारात फिरून येत आहेत.
बॉक्स
वाहन उभे
बंगल्यात तहसीलदार नसले तरी त्यांची एमएच २७ एए ५६५ क्रमांकाचे शासकीय वाहन एका झाडाखाली आडोशाला उभे आहे. काही महिन्यांपासून उभी असलेली ही बेवारस अवस्थेतील शासकीय गाडी हा बंगला तहसीलदारांचा असल्याची ग्वाही देत आहे.
बंगल्याशेजारी अतिक्रमण
महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण होऊ न देण्याची जबाबदारी सर्वसामान्यपणे महसूल विभागाकडे जाते. सर्वसामान्य लोकही अतिक्रमणाविरुद्ध याच विभागाकडे दाद मागतात. पण, या तहसीलदारांच्या बंगल्याला लागून नव्हे, तर बंगल्यातच अतिक्रमण झाले, असे म्हणणे वावगे ठरू नये. मागील अनेक वर्षांपासून हे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे.