लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : दोन वर्षांपूर्वी लग्न झाल्याने पै पै जोडून संसार उभा केला. हात मजुरीवर जीवनाचा हा डोलारा कसाबसा चालू असताना अचानक शनिवारी पहाटे पाच वाजता आतापर्यंतच्या आयुष्याची कमावलेल्या पूंजीची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली. पती-पत्नी झोपेतच होते. अचानक घराने पेट घेतला. त्या पेटत्या घरातील आगीचा चटका या दाम्पत्यास लागला. क्षणात झोप उघडली आणि ते दोघेही घराबाहेर पळाले म्हणून बचावले. चिखलदरा तालुक्याच्या सोनापूर येथील या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.सुरेश शालिकराम हरसुले (३०, रा सोनापूर) असे घर जळालेल्या इसमाचे नाव आहे. सुरेश व त्यांची पत्नी रोशनी हे नेहमीप्रमाणे घरात झोपले असताना शनिवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान अचानक घराने पेट घेतला. यात भांडीकुंडी, कपडे, बिस्तरे, धान्य व साहित्य आदी जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सर्व गाव झोपेत असताना हरसुले दाम्पत्याने आरडाओरड केली. गावकरीही हातात मिळेल त्या भांड्यात पाणी घेऊन घर विझवण्यासाठी धावले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सर्व सामान जळाले. सुरेश व रोशनी या दांपत्याला आयुष्याची सुरुवात करतानाच आपल्या स्वप्नांच्या घराची राखरांगोळी पहावी लागली. त्यांच्या लग्नाला केवळ दोन वर्षे झालीत. हरसुले दाम्पत्य शिक्षित असल्याने मजुरी करीत असतानाही त्यांच्याकडे लॅपटॉप, मोबाईल होते. या आगीत त्यांचा लॅपटॉप, मोबाईल, मंगळसूत्र, आधार कार्ड, ओळखपत्र, टीसी आदी महत्त्वपूर्ण दस्तावेज सुद्धा जळून राख झाली. पटवारी एन. डी. तांडीलकर यांनी पंचनामा केला.
मेळघाटात घरांना आगी, अग्निशमन यंत्रणा नाहीमेळघाटात दरवर्षी मोठ्या प्रमाणात जंगलासह आदिवासी पाड्यांमध्ये अग्नितांडवामुळे आदिवासींच्या घरांची राखरांगोळी होते. चुलीतील विस्तव, शॉर्टसर्किट, कचऱ्याच्या ढिगाऱ्यास लावलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात आगी लागल्याची कारण आतापर्यंत पुढे आली आहे. गतवर्षी सेमाडोह येथे ढाण्यात ३० पेक्षा अधिक घरांची राखरांगोळी झाली होती. शनिवारी धारणी तालुक्याच्या लवादा येथे सुद्धा घराला आग लागली. सोनापूर येथे आग कशाने लागली, याचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही. जंगलात आगी लावल्या जात असल्याचे सर्वविदिेत सत्य आहे. मात्र ते विझवण्यासाठी कुठेच अग्निशमन यंत्रणा नाही.