५ ते १० रुपयांची वाढ; नावीन्यपूर्ण राख्यांना मागणी
अमरावती : रक्षाबंधनाच्या निमित्ताने सध्या बाजारपेठांमध्ये राख्यांचे विविध भेटवस्तू खरेदी करण्यासाठी लगबग वाढली आहे. मात्र, बहीण-भावाचे नाते दृढ करणारी राखी यंदा महागाईच्या फेऱ्यात अडकली आहे. गतवर्षी ५ ते १० रुपयांना असणारी राखी यंदा १५ ते २० रुपयांना मिळत आहे. सध्या बाजारपेठेत लायटिंगच्या राख्यांची क्रेज आहे. याशिवाय रेशीम धागे व चंदन राख्या, मोती रुद्राक्ष यासारख्या राख्यांचे असंख्य प्रकार बाजारात विक्रीस आले आहेत.
शहरातील प्रमुख बाजारपेठेत राखीची दुकाने सजली आहेत. राखी खरेदीसाठी दुकानांमधून बहीण आपल्या लाडक्या भावासाठी सुंदर व आकर्षक राख्या खरेदी करताना दिसत आहे. लांब राहणाऱ्या आपल्या लाडक्या भावाला बहिणीकडून राख्या पाठविण्यासाठी पोस्टातही राख्या पाठविणाऱ्यांची रेलचेल दिसून येत आहे. बहीण-भावाच्या अतूट नात्याचा रेशीम धाग्यांनी जोडणारा सण म्हणजे रक्षाबंधन या सणानिमित्त आकर्षक राख्यांना बाजारात मोठी मागणी आहे. ५ ते २०० रुपयावर दर असलेल्या राख्या महागल्या आहेत. ऑनलाईन राख्या व गिफ्ट खरेदीला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. बाजारपेठेतील दुकाने पालथी घालून लाडक्या भावासाठी बहीण मनासारखी राखी मिळेपर्यंत पायपीट करताना दिसत आहे.
बॉक्स
खरेदीची लगबग
रक्षाबंधन सण आता अवघ्या एका दिवसावर आला आहे. त्यामुळे महिला व भगिनी आपल्या भावासाठी बहिणी राखी खरेदी करताना बाजारपेठेत दिसून येत आहेत. राख्यांमध्ये रेशीम धागे व चंदन राख्या, मोती रुद्राक्ष, खडे, मोती रेशीम धागा, प्लॅस्टिकची फुले, मॉर्डन डिझाईन आणि लूक असलेल्या असंख्य राख्या विक्रीस उपलब्ध आहेत. ५ ते २०० रुपयांवर राखी दर असल्याचे राखी विक्रेते भूषण मालधुरे यांनी सांगितले.