अमरावती: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणावरून राजद्रोहाचा गुन्हा आणि १४ दिवस जेलची वारी करावी लागली होती. त्यानंतर तब्बल ३६ दिवसांनी शनिवारी अंबानगरीत दाखल झालेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी निवासस्थानी दुग्धाभिषेक केला. चार पुजाऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा झाली. यावेळी दीडशे किलोच्या हारतुऱ्यांनी राणा दाम्पत्याचे स्वागत करण्यात आले.
राणांच्या ‘गंगा-सावित्री’ निवासस्थानी शनिवारी दुपारपासून समर्थक, हनुमान भक्तांनी गर्दी केली होती. सुनील राणा, युवा स्वाभिमाने जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, अजय मोरया, जयश्री मोरया यांच्या पुढाकाराने राणा दाम्पत्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी चार पुजाऱ्यांकडून मंत्रोपचार करण्यात आले. तब्बल तासभर राणा दाम्पत्याचा दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम चालला. प्रारंभी मातोश्री सावित्री राणा यांच्या हस्ते राणा दाम्पत्याचे औक्षण करण्यात आले. तुतारीचा निनाद आणि भक्तीमय वातावरण लक्षणीय ठरले.
यावेळी साई राजेशलाल, नानक आहुजा, राजेश यादव, संदीप गुल्हाणे, प्रवीण साळवे, अनिल राठी, प्रभू श्रीव्यास, शरद बसेरिया, मनीष गायकवाड, विनोद येवतीकर, प्रफुल्ल जयस्वाल, जयप्रकाश जयस्वाल, अजय जयस्वाल, महेश छाबडा, संकेत गोयनका, शंकर बागलानी, अंकुश गोयनका, राहुल बजाज, पीयूष झांबाणी आदी उपस्थित होते.