अमरावती : दहीहंडीच्या निमित्ताने पायाला भिंगरी लागल्यागत फिरत असलेल्या राणा दाम्पत्याच्या बेताल व्यक्तव्याने मंगळवारी जिल्ह्याचे राजकीय वातावरण पार ढवळून निघाले. दर्यापुरात काँग्रेसच्या आमदारांना आपल्या नेत्यांचे पादत्राणे उचलणारा म्हटले तर तिवस्यात आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्यावर जहरी टीका केली. बच्चू कडू यांचे नाव न घेता त्यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ‘घर मे घूस के मारेंगे’ची भाषा पुन्हा उच्चारली. एकंदरीत मंगळवार हा पॉलिटिकल वार ठरला. राणांच्या आरोपाला या नेत्यांनीही सडेतोड उत्तर देत या दाम्पत्यावर आगपाखड केली. यशोमती ठाकूर यांचे असे आक्रमक रूप तर अनेकांनी पहिल्यांदा अनुभवले. शिवाय बच्चू कडू यांनाही नाव न घेता टार्गेट करण्यात आले. राणा यांनी घरात घुसून मारण्याची भाषा पुन्हा वापरली तर बच्चू कडू यांनी कपडे काढून मारण्याचा दम दिला.
दर्यापूरचे काँग्रेस आमदार बळवंत वानखडे हे अमरावती लोकसभा निवडणुकीचे माविआचे संभाव्य उमेदवार आहेत, त्यामुळे आज अंजनगाव सुर्जी येथे दहीहंडी स्पर्धेत आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावर वादग्रस्त टीका केली. दर्यापूरचा आमदार तिवसा मतदारसंघाच्या आमदाराच्या चपला उचलतो... चपला... रवी राणा यांनी असे बेताल विधान केल्याने चांगलाच वाद निर्माण झाला. जात प्रमाणपत्रासाठी राणा केंद्राचे तळवे चाटतात, असे म्हणत आधी शरद पवार यांचे बाप होते, आता मोदींना बाप म्हणतात, असे म्हणत आमदार वानखडे यांनी पलटवार केला.
कडक नोटा घेतल्या, भाजपात जाणार होत्या
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्या आणि काम दुसऱ्याचे केले, असे वक्तव्य करून खासदार नवनीत राणा यांनी आगीत तेल ओतले. २०२४ ची लोकसभा निवडणूक आता जवळ येत असल्याने अमरावती जिल्ह्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली असून नवनीत राणा यांनी हा गौप्यस्फोट केला. ज्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आले तेव्हा त्या यादीत यशोमती ठाकूर यांचेदेखील नाव होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपद देण्यास नकार दिल्याने यशोमती ठाकूर यांनी भाजप प्रवेश केला नाही, असा आरोप रवि राणा यांनी तिवस्यात केला.
औकातीत राहा, पैसे घेतले असेल तर सिद्ध करून दाखव
रवि राणा यांनी औकातीत राहावे, खोटे बोला; पण रेटून बोला, अशी राणा यांची नीती असून जीव गेला तरी बेहत्तर; पण काँग्रेस सोडणार नाही. उगाच अफवा पसरवून लफंटूसपणा करायचा नसतो, असे म्हणत आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी पलटवार केला. वहिनी आहात तुम्ही, म्हणून तुमच्या प्रचारासाठी आम्ही घरोघरी फिरलो होतो, पण वहिनींचं प्रमाणपत्रच खोटं निघालं तर यात दोष कुणाचा. उगाच काहीतरी बोलायचं आमच्या रक्तात नाही, आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे त्यामुळे काँग्रेसच्या पलीकडे काही विचार करू शकत नाही. पुढच्या काळामध्ये हनुमानजी तुम्हाला याचे परिणाम दाखवतील... असे प्रत्युत्तर यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला दिले.
माझ्या वडिलांनी जमीन देण्याचे काम केले आहे, कुणाची जमीन बळकावण्याचे नाही. आजही आम्हाला निवडणूक लढताना एक एकर शेत विकावे लागते. त्यामुळे बिनबुडाचे आरोप करताना चार बोटं आपल्याकडेही आहेत, हे विसरू नये. दरम्यान, यशोमती ठाकूर जाम संतापल्या होत्या. त्यांनी या दाम्पत्याचा खरपूस समाचार घेतला.