आदिवासी करिता रानभाजी प्रदर्शन
फोटो - रानभाजी १० पी
धारणी : रानभाज्यांमधील प्रथिनांबद्दल युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे या आरोग्यदायी भाज्या आजच्या युवा पिढीच्या आहारातून दुरावलेल्या आहे. हे हेरून कृषी विभागाने धारणी येथे नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होेते.
मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी सोमवारी रानभाजी महोत्सवाचे उदघाटन केले. सातपुडा पर्वतरांगांमध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत. कंदमूळ, फुलेे, पानांच्या स्वरूपातील या भाज्या पावसाळ्याच्या सुरवातीला जंगलात आढळून येतात. रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या रानभाज्यांतून मिळणाऱ्या प्रथिनातून राज्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. अनेक रानभाज्यात तर शरीराला पोषक असे औषधी गुणधर्म आहेत. पावसाळ्यात वेलीवर लागणारे कर्टुली ही रानभाजी गर्भवती आणी लहान बालकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. कुर्डूच्या बिया मुतखडा आणि जुनाट खोकला, वृद्धाच्या कफ विकारावर उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे. या रानभाजी महोत्सवाला पंचायत समिती सभापती सुलोचना जांबे, उपसभापती भाऊ हेगडे, माजी सभापती रोहित पटेल, प्रकाश घाडगे, तारासिंह कासदेकर, डॉक्टर कळसकर, कडू, वाघमारे, देशमुख, पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी पाडवी, पठाडे तसेच उमप, सोनवणे, एस.बी. वरघट, लांडे, मोहेकर, बेठेकर यांच्यासह चिखलदरा व धारणी कृषी मंडळातील सर्व कर्मचारी हजर होते.