वरूड (अमरावती) : शहरापासून १२ किमी अंतरावरील मध्य प्रदेश सीमेतील जंगलात नेचर प्राइड वॉटर पार्क अँड रिसॉर्ट येथे बुधवारी एका व्यावसायिकाने ‘ओली’ पार्टी आयोजित केली होती. ती रेव्ह पार्टी असल्याची माहिती मिळाल्यावरून मुलताई पोलिसांनी मध्यरात्रीनंतर एक वाजता धाडसत्र राबविले. येथून मद्यधुंद अवस्थेतील ३४ पुरुष आणि ११ महिलांना डीजेवर हिडीस नृत्य व अश्लील कृत्य करताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
मुलताई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश सीमेवरील गोनापूर चौकीनजीक पट्टण घाटातील जंगलात हे रिसॉर्ट आहे. येथे एका व्यावसायिकाने बुधवारी रात्री पार्टी आयोजित केली होती. यात डीजेच्या तालावर महिला-पुरुष मद्यधुंद स्थितीत थिरकत होते. याबाबत मुलताई पोलिसांकडून बैतूल पोलिस अधीक्षकांनी कळविल्यानंतर मुलताई आणि आठनेर पोलिसांचे पथक मध्यरात्री एक वाजता घटनास्थळी रवाना करण्यात आले. रिसॉर्टला घेराव करून पार्टीतील ३४ पुरुष आणि ११ महिलांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३४ (१), ३६ (ए), ३६(बी), कोलाहल अधिनियम कलम ७/१५ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
बैतूल येथील पोलिस अधीक्षक निश्चल झारिया यांच्या मार्गदर्शनात मुलताईचे ठाणेदार राजेश सातनकर यांच्यासह मुलताई व आठनेर पोलिसांच्या पथकांनी ही कारवाई केली.----------------------आरोपींमध्ये वरूड तालुक्यातील दोघेघटनास्थळावरून विदेशी मद्याच्या दोन पेट्या, ३७ बीअर बॉटल, ग्लास, म्युझिक सिस्टम, स्पीकर जप्त केले. रिसॉर्टच्या मॅनेजरसह पुरुषांना मुलताई पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची वाहनेदेखील जप्त करण्यात आली. आरोपी पुरुष पांढुर्णा व सिवनी जिल्ह्यातील आहेत, तर महिला बहुतांश नागपूरहून बोलावण्यात आल्या होत्या, असे एफआयआरमधून स्पष्ट होत आहे. पुरुषांमध्ये दोघे वरूड तालुक्यातील तरुण आहेत. ते दोघे या रिसॉर्टमध्ये कामावर आहेत.