अमरावती: ‘अभी तू रुक, तेरा मर्डर करता!’ अशी धमकी देत चौघांनी आपल्याला चाकुच्या धाकावर खंडणीची मागणी केली, अशी तक्रार हॉटेल व्यावसायिक महेश छाबडा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी२९ एप्रिल रोजी पहाटे चारच्या सुमारास अश्विन उके (३४), स्वप्निल बाबनकर (३०, दोघेही रा. बिच्छूटेकडी) व अन्य दोन अनोळखींविरूध्द खंडणीची मागणी, धमकीचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, महेश छाबडा यांचे एमआयडीसी भागात बार ॲन्ड रेस्टारंट आहे. २७ एप्रिल रोजी उशिरा रात्री अश्विन उके व त्याचे तीन मित्रांनी जेवण घेतले. ते दारू देखील प्यायले. मात्र त्यांनी बिल देण्यास नकार दिला. त्यामुळे महेश छाबडा हे हॉटेलमधील काऊंटरवर आलेत. त्यावेळी आपण उके याला पैसे मागितले असता, त्याने सर्वांसमोर आपल्याला अश्लिल शिविगाळ केली. तू पैसे मागणारा कोण, हॉटेल चालवायचे असेल तर मला प्रत्येक महिन्याला पैसे लागतिल. नाहीतर तुझा मर्डर करेन, असे म्हणून उके याने आपली कॉलर पकडली. तो बिलाचे पैसे न देता त्याच्या मित्रांसह हाॅटेलमधून निघून गेल्याचे छाबडा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
शंकरनगर रस्त्यावर दमबाजीदरम्यान २८ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास छाबडा हे महेश खोडे यांच्यासह शंकरनगर रस्त्याने जात असताना अश्विन उके त्यांना भेटला. तू माझी तक्रार कुठे केली आहे. ते मला माहित आहे, तू हप्ता सुरू करणार नाहीस ना, आता तू थांब, तुझ्या हॉटेलमध्ये येऊन तुझा मर्डर करतो. हॉटेलही तोडफोड करतो, अशी धमकी देऊन तो निघून गेल्याचे छाबडा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
बोला था ना वापस आऊंगा
२८ एप्रिल रोजी रात्री १० च्या सुमारास छाबडा हे अन्य तिघांसह उभे असताना अश्विन उके व स्वप्निल बाबनकर हे अन्य दोघांसह एका कारने हॉटेलसमोर आले. आरोपींना त्यांना शिविगाळ केली. ‘बोला था ना वापस आऊँगा, असे म्हणून अश्विन उके याने चाकू काढला. तो दाखवत अभी तु रुक, तेरा मर्डर करता, अशी धमकी त्याने दिली. त्यावेळी आपण हॉटेलच्या आत निघून गेलो. त्याबाबत डायल ११२ वर माहिती दिल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले.