जागरूक नागरिकांमुळे अनर्थ टळला : मध्यरात्री शहरात मद्यपी, वासनांध तरूणांचा वावरअमरावती : मध्यरात्रीनंतर शहरात काही वासनांध तरूण निराधार मतिमंद महिलांवर वक्रदृष्टी ठेऊन आहेत. शनिवारी मध्यरात्री सायंस्कोर मैदानात एका २७ वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला. मात्र, काही जागरूक नागरिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी ‘त्या’वासनांध तरूणालाचोप देत कोतवाली पोलिसांच्या स्वाधिन केले. विविध शहरांमधून रेल्वेतून भिकारी, निराधार आणि मतिमंद महिला शहरात येतात. कोणताच निवारा, आश्रयस्थळ नसल्याने ते भटकंती करीत असतात. अशा निराधार, विमनस्क महिलांवर काही वासनांध तरूण नजर ठेऊन आहेत. शनिवारी मध्यरात्री एका मतिमंद महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याने पुन्हा एकदा हा प्रकार उजेडात आला. एक २७ वर्षीय महिला रेल्वे स्थानक परिसरात फिरताना काही जागरूक नागरिकांना आढळून आली. काही समाजकंटक तिचा पाठलाग करीत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्या महिलेवर पाळत ठेवली. ती महिला बसस्थानकमार्गे निघाल्यावर तिचा मागोवा घेत एक वासनांध तरूणही तिच्या मागोमाग निघाला. ती महिला अचानक सायन्सकोर मैदानातील अंधारात शिरली. अंधाराचा फायदा घेऊन त्या तरूणाने मतिमंद महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जागरूक नागरिक वेळीच तेथे पोहोचल्याने अनर्थ टळला. नागरिकांनी त्या तरुणाला पकडून बेदम चोप दिला. व पोलिसांना माहिती दिली. कोतवाली पोलिसांनी तरूणाची कसून चौकशी केली असता तो पुलगाव येथील असल्याचे समजले. शिक्षणासाठी तो अमरावतीत आला होता आणि रात्री शहरात फिरत असल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. असे प्रकार थांबविणार कसे?शहरात निराधार, मतिमंद महिला रेल्वे व बसस्थानकासह इर्विन रुग्णालयाच्या आवारात आश्रय घेतात. यामहिलांवर लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा प्रकार झाला तरी त्या कुणाकडे त्याची वाच्यता करू शकत नाहीत. असे प्रकार सुज्ञ, कर्तव्यदक्ष व समाजसेवी नागरिकांच्या लक्षात आल्यावरच उघड होतात. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी तत्काळ पोलीस यंत्रणेला कळविणे आवश्यक आहे. मगच या घटना टळू शकतील. मतिमंद महिला मध्यरात्रीनंतर फिरताना आढळून येतात. यामहिलांवर समाजकंटक पाळत ठेऊन असतात. शनिवारी मध्यरात्री एका तरुणाला मतिमंद महिलेवर अत्याचार करताना पकडले. सुदैवाने वाईट घटना टळली. त्यामुळे त्या तरुणाला ताकिद देऊन सोडण्यात आले. -आर.एस.लेवटकर, सहायक पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे.
‘सायन्सकोर’मध्ये मतिमंद महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
By admin | Published: April 17, 2017 12:06 AM