अमरावती : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी एका आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र जोशी यांनी मंगळवारी हा निर्णय दिला, तर प्रकरणातील चार आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. सन २९१७ च्या सप्टेंबर महिन्यात शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. अब्दुल नासीर ऊर्फ सागर अब्दुल रशीद (२३, रा. अन्सारनगर, अमरावती) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
विधी सूत्रांनुसार, आरोपी अ. नासीर हा ऑटोरिक्षाचालक असून, त्याने पीडिताशी वेळोवेळी अतिप्रसंग केला. त्यानंतर २३ सप्टेबर २०१७ रोजी आरोपीने तिला ऑटोरिक्षात बसवून बडनेरा रोडवर नेले. तेथे तिच्याशी कुकर्म केले. नंतर ते नागपुरी गेटला पोहोचले. तेथे अन्य तिघे आले. तिला गणोजादेवी शिवारात नेण्यात आले. तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडिताच्या आरडाओरडीमुळे काही स्थानिक तेथे पोहोचले. तेथे ऑटोचालक नवाज खान याला पकडण्यात आले, तर अन्य चार आरोपी पसार झाले. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी अ. नासीर अ. रशीद (२३, अन्सारनगर), नवाजखान अजीज खान (३८, रा. अलिमनगर), शेख जुबेर कुरेशी शेख नुरा (२५, अन्सारनगर), मुबारक ऊर्फ वसीम खान सिकंदर खान (२८, गुलिस्तानगर) व सादिक शाह गफूर शाह (२९, रा. गणोजादेवी) यांच्याविरुद्ध पळवून नेणे, सामूहिक बलात्कार व पोक्सो अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
याप्रकरणी १६ साक्षीदार तपासण्यात आले. पैकी पीडिता, पोलीस व डॉक्टर वगळता अन्य साक्षीदार फितुर झाले. या प्रकरणातील पॉझिटिव्ह डीएनए रिपोर्ट व साक्षीदारांच्या साक्ष विचारात घेऊन न्या. रवींद्र जोशी यांनी आरोपी अ. नासीर याला बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी मानून १० वर्षे सश्रम कारावास, तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, कलम ३६३ मध्ये चार वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. पीडिताला ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेशदेखील न्यायालयाने पारित केला. दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावयाच्या आहेत. सरकारी बाजू सहायक सरकारी वकील सोनाली क्षीरसागर यांनी मांडली.