लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: शहरात कोरोनाचा पाय चांगलाच पसरू लागला आहे. रविवारी सकाळी हबीबनगरात एकाच कुुटुंबातील तीन व अन्य एक तसेच कोविड रुग्णालयातील एक महिला कर्मचारी अशा एकूण पाच व्यक्तींचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही १५७ वर पोहोचली आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठद्वारे प्राप्त अहवालानुसार, हबीबनगरातील ३१ वर्षीय व्यक्ती २१ तारखेला कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात येऊन त्यांचा स्वॅव तपासणीला पाठविला होता. त्याचा अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. यामध्ये पाच वर्षीय चिमुकली, ३० व ६५ वर्षीय महिला व ३३ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. त्यांना कोविड रुग्णालयातील दुसऱ्या माळयावरील कक्षात हलविण्यात आले आहे.याव्यतिरिक्त कोविड रुग्णालयातील ४५ वर्षीय परिचारिकेचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. कोविड रुग्णालयात १० दिवसांची सेवा आटोपल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येते. या महिलेचा थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविण्यात आला होता. याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाल्याने कोविड रुग्नालयातील चौथा वॉरिअर संक्रमित झाला आहे.आरोग्य विभागाद्वारे या संक्रमित रुग्णांची हिस्ट्री घेण्याचे काम सुरू आहे. बाधिताच्या घराकडील मार्ग बंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या भागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार आहे. हबीबनगर परिसर यापूर्वीच कंटेनमेट जाहीर केला असल्याने आशा व एएनएम व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे गृहभेटी देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
कोविड रुग्णालयातील चौथा वॉरिअर संक्रमितशासकीय संदर्भ सेवा रुग्णालयात उभारलेल्या कोविड रुग्णालयातील चार कोरोना वॉरिअर आतापर्यंत संक्रमित झाले आहेत. यापूर्वी अंबिकानगर व बेलपुरा येथील दोन सहायक कर्मचारी, शनिवारी अकोल्याच्या अनंतनगरातील रहिवासी असलेला कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आणि रविवारी याच रुग्णालयाची महिला परिचारिका कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. या चौघांव्यतिरिक्त जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना वॉरिअर संक्रमित झाले आहेत.