मनीष तसरे
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये अधिवास असलेल्या दुर्मीळ ‘रानपिंगळा’ या घुबडवर्गीय पक्ष्याच्या शहरातील वन्यजीव छायाचित्रकार मनोज बिंड यांनी टिपलेल्या छायाचित्रास भारतीय डाक विभागाने जारी केलेल्या पोस्ट कार्डावर स्थान मिळाले आहे.
राष्ट्रीय डाक सप्ताहाचा एक भाग म्हणून भारतात १३ ऑक्टोबर रोजी संग्रह दिवस साजरा केला जातो. या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्प आणि सन्मानचिन्हे प्रकाशित करण्याची डाक विभागाची परंपरा आहे. राष्ट्रनिगडित विविध प्रसंग, व्यक्तीविशेष, स्थानविशेष इत्यादीवर वैविध्यपूर्ण आणि रोचक स्मरणे यापूर्वी प्रकाशित झाली आहेत. हौशी आणि दर्दी संग्राहक या प्रकारच्या प्रकाशनाची आतुरतेने वाट बघत असतात.
भारतीय डाक विभाग महाराष्ट्र व गोवा यांच्या वतीने बीएनएचएस या संस्थेच्या सहकार्याने यावर्षी संग्रह दिनानिमित्त ‘पक्षी विविधता’ या विषयांतर्गत संकटग्रस्त पक्षांच्या छायाचित्रांचे पोस्ट कार्ड प्रकाशित करण्यात आले आहेत. यापैकी एका पोस्ट कार्डवर अमरावती शहरातील वन्यजीव छायाचित्रकार मनोज बिंड यांनी टिपलेल्या रानपिंगळा या दुर्मीळ पक्ष्याच्या छायाचित्राला स्थान मिळाले आहे. हा प्रकाशन सोहळा नुकताच जनरल पोस्ट ऑफिस, मुंबई येथे पार पडला. या उपक्रमाकरिता बीएनएचएस संस्था आणि किशोर रीठे, डॉ. राजू कसंबे, जयंत वडतकर यांचे विशेष सहकार्य लाभले असून या निमित्ताने अमरावतीसह मेळघाट आणि रानपिंगळा पक्ष्याला राष्ट्रीयस्तरावर सन्मान मिळणे ही अभिमानास्पद बाब आहे.
भारतीय डाक विभागाने निवडक एकूण बारा विविध पक्ष्यांच्या बारा पोस्ट कार्डाचा संच हौशी आणि उत्सुक संग्रहकांसाठी २०० रुपये मूल्य आकारून केवळ जनरल पोस्ट ऑफिस, मुंबई या कार्यालयात प्राथमिक स्तरावर उपलब्ध करून दिला होता. मात्र, इच्छुकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पहिली वृत्ती हातोहात संपली. यामुळे लवकरच या पोस्ट कार्डाची अधिक प्रमाणात छपाई करून विस्तृत वितरणाकरिता उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती मिळाली.
रानपिंगळा अर्थात ‘डुडा’च्या पुनर्शोधाची रोचक कहाणी
रानपिंगळा म्हणजे फॉरेस्ट आऊलेट या घुबडवर्गीय पक्ष्याची १८८४ साली झालेली नोंद ही शेवटची समजल्या गेली. हा पक्षी त्यानंतर पुन्हा कुठेही आढळून आल्यामुळे तो विलुप्त झाल्याचा समज झाला होता. मात्र, तब्बल ११३ वर्षांनी म्हणजे १९९७ साली अमेरिकेच्या पामेला रासमुसेन या महिला पक्षी शास्त्रज्ञाने हा पक्षी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पुन्हा शोधून काढला. या पुनर्शोधाची जगभर दखल घेतल्या गेली. पुढे अमरावती जिल्ह्यात १९९८ ते २००३ या कालावधीत केलेल्या संशोधनात मेळघाटमध्येही याचे आश्चर्यकारकरीत्या अस्तित्व आढळून आले. स्थानिक कोरकू भाषेत याला ‘डुडा’ असे नाव आहे. आज मेळघाट हे रानपिंगळ्याच्या विपुल प्रमाणाकरिता आणि सुयोग्य अधिवासाकरिता जगाच्या नकाशावर महत्त्वाचे ठिकाण ठरले आहे.
बहुतांश घुबडवर्गीय पक्षी रात्रींचर असतात. मात्र, रानपिंगळा हा दिवसा सक्रिय असतो. हे या पक्ष्याचे खास वैशिष्ट्य आहे. रानपिंगळा याचे शास्त्रीय नाव - ॲथेने ब्लेवीट्टी असे आहे. मी हा फोटो २०१५ साली मेळघाटच्या जंगलात टिपला आहे. मेळघाट हे रानपिंगळ्याच्या विपुल प्रमाणाकरिता आणि सुयोग्य अधिवासाकरिता जगाच्या नकाशावर महत्त्वाचे ठिकाण ठरले आहे.
- मनोज बिंड, वन्यजीव छायाचित्रकार