भाऊसाहेबांची विधी महाविद्यालयाला अनमोल भेट : पहिल्या हजार प्रतिंपैकी एक, हस्तलिखित संसदेच्या वाचनालयातसंदीप मानकर अमरावतीमसुदा समितीच्या सदस्यांसमवेत, राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहिली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी तिचा घटना परिषदेने स्वीकार केला. या संविधानाच्या सर्वात प्रथम हजार प्रति प्रकाशित करण्यात आल्यात. पंजाबराव देशमुख यांना मिळालेली त्यापैकीची एक मूळ प्रत येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात जतन करून ठेवण्यात आली आहे. या वैभवापासून अमरावतीकर अनभिज्ञ आहेत.शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब देशमुख भारताचे कृषिमंत्री होण्यापूर्वी घटना परिषदेचे सदस्य होते. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान दिनाच्या दिवशी घटना परिषदेच्या सर्व सदस्यांना भारतीय राज्यघटनेची एक-एक मूळ प्रत (प्रथम प्रकाशित) देण्यात आली होती. भाऊसाहेबांनी ती प्रत शिवाजी संस्थेला प्रदान केली. संस्थेने ती विधी महाविद्यालयात ठेवली. विधी महाविद्यालयाने प्राचार्यांच्या कक्षात काचेच्या सुंदर कोंदणात ही प्रत जतन करून ठेवली आहे. या दुर्मिळ प्रतिच्या पहिल्या पानावर राजमुद्रा अंकित आहे. पान क्र. २ वर घटनेची प्रस्तावना आहे. ही प्रत २३० पानांची असून घटना परिषदेच्या सर्व सदस्यांनी या प्रतीवर स्वाक्षरी केल्या आहेत. यामध्ये पहिल्या पानावर प्रथम स्वाक्षरी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची असून दुसरी स्वाक्षरी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आहे. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी २२३ व्या तर २२९ क्रमांकाच्या पानावर भाऊसाहेब देशमुख यांची स्वाक्षरी आहे.मूळप्रतिंचे असे झाले मुद्रणघटना समितीच्या हस्तलिखितांवरून फोटोलिथोग्राफिक या मुद्रण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वप्रथम हजार प्रतिंचे मुद्रण करण्यात आले. हस्तलिखित मूर्त रूपात यायला पाच वर्षांचा कालावधी लागला होता. हस्तलिखित लोकसभेच्या ग्रंथालयात हेलियमयुक्त पेटीत सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. मुद्रित प्रतिंमधील कॅलिग्राफी (लेखनाचा कलात्मक प्रकार) प्रेम बिहारी नरैन रायझाडा यांची आहे. नंदलाल बोस आणि त्यांच्या चमुने कॅलिग्राफी मुद्रणस्वरुपात सादर केली. सर्व्हे आॅफ इंडियाच्या डेहराडून कार्यालयात या प्रतिंचे प्रकाशन झाले.संस्थेचा हा अनमोल ठेवा आहे. संस्थेने तो आतापर्यंत जपून ठेवल्यामुळे वकिली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मूळप्रत प्रत्यक्ष बघता आली.- प्रणय मालवीय, प्राचार्य विधी, महाविद्यालय.डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी विधी महाविद्यालयाला संविधान प्रतीच्या रुपाने अनमोल ठेवा दिला आहे. महाविद्यालय त्याचे जतन करीत आहेत. ही प्रत अंबानगरीत असणे हे नगरीचे भाग्यच.- प्रकाश दाभाडे,विधी समन्वयक, अमरावती.