अमरावती : नवसारी परिसरात अतिशय दुर्मिळ पिवळ्या ठिपक्याचा कवड्या साप हेल्प फाऊंडेशनच्या सदस्यांना आढळला. याची नोंद वन विभागाने केली आहे.
हा साप भारतात मोजक्याच ठिकाणी आढळून येतो. हेल्प फाऊंडेशनने आतापर्यंत हा साप मृत स्वरूपात सापडल्याच्या अनेक नोंदी केल्या होत्या. परंतु हा साप जिवंत स्वरूपात आढळून येण्याची ही पहिलीच नोंद आहे. हा साप निशाचर आहे. पाली, सरडे व लहान कीटक त्याचे भक्ष्य आहे. हा साप स्वभावाने अतिशय मवाळ असतो, म्हणून सहसा चावत नाही. याचा रंग काळा असून शरीरभर पिवळे ठिपके असणार. त्यामुळे हा साप मण्यार या विषारी सापासारखा दिसतो. अमरावतीच्या जैवविविधतेत आणखी एका दुर्मिळ सापाची भर पडल्यामुळे निसर्गप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. हा साप हेल्प फाऊंडेशचे सदस्य श्रीकांत गावंडे, शुभम गायकवाड, धवल कुंभरे, विक्की गावंडे, सुमेध गवई यांनी शोधून काढला.