अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला मानवतेचा संदेश हा जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचे विचार हे जगासमोर मांडणे त्याचा प्रचार-प्रसार करणे तितकेच महत्वाचे असल्याचे मत वॉशिंग्टन डीसी येथील विल्यम हॅरिस यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले. दरवर्षी प्रमाणे यंदाही विल्यम हॅरिस यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये आमंत्रित केले आहे. २ नोव्हेंबरला सकाळी ते मोझरी येथील राष्ट्रसंताच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन येथील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
विल्यम हॅरिस यांच्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा पगडा आहे. मागील दहा वर्षापासून ते नियमित राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत. ते भारतातील संत, महापुरुषांच्या विचारांनी प्रेरीत असून राष्ट्रंसंत तुकडोजी महाराज यांचा ‘मानवता हाच धर्म’ हा विचार जगामध्ये पोहचविण्याचे काम करत आहेत. दरवर्षी ते आपल्य विदेशी मित्रांना राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये सहभागी करुन घेतात. राष्ट्रसंता बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संघर्षाची सुद्धा ख्याती जगभरात माहिती व्हावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.
यावर्षी विल्यम हॅरिस यांच्या सोबत मेरिलँड येथील कँडिस व्हिटेकर, स्पेन येथील सर्जिया ग्राझियानो, न्यू जर्सी येथील योराना बोस्टर, यूएसएमधील डॅनियल मिलर आणि सारा मोरेल, कोलोरॅडो मधील मिशेल फोरियर, न्यूयॉर्क मधील फ्रँक लोविन, लाग वेगास मधील मिशेल डिर्लाड हे पुण्यतिथी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत. भारतीय संस्कृती आणि येथी संत, महापुरुषांचा विचार ते जाणून घेणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.