गुरुकुंज आश्रम (अमरावती) : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, गुरुकुंज आश्रमद्वारा आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या ५४ व्या पुण्यतिथी महोत्सवाला ८ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
कोरानानंतर प्रथमच महोत्सवात गुरुदेवभक्त हजेरी लावणार आहेत. ८ ऑक्टोबर रोजी ब्रम्हमुहूर्तावर ४.३० वाजता संत शंकर महाराज व संत अंबादास महाराज यांच्या हस्ते तीर्थस्थापनेने महोत्सवाला सुरुवात होईल. या सात दिवसीय सोहळ्यात दररोज सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, ग्रामसफाई, प्रवचन, कीर्तन स्पर्धा, भजन, योगासन शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ, कार्यकर्ता संमेलन, महिला मेळावा आदी कार्यक्रम होणार आहेत.
९ ऑक्टोबर रोजी सामुदायिक ध्यान, योगासन शिबिर, ग्रामगीता प्रवचन, कीर्तन स्पर्धा, १० ऑक्टोबर रोजी सुधीर बोराळे यांचे ग्रामगीता प्रवचन, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, रात्री ८.१५ वाजता ‘मैफल स्वरांची’ व रात्री ९.३० वाजता सुश्री जानकीश्री यांचे कीर्तन होईल. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता महिला संमेलन, रात्री ८ वाजता सुशील वणवे व सोनाली करपे यांचे कीर्तन, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर सुश्री विजयादेवी यांचे चिंतन, सकाळी ९ ते ५ या वेळेत ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ, रात्री ८.१५ ते १० या वेळेत लोकगीते व शुकदास गाडेकर यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार मौन श्रद्धांजलीनंतर सायंकाळी ६ ते ६.४५ या वेळेत मिस लॉरा बॅकस्टर (जर्मनी) यांचे भजन तसेच विल हॅरीस (अमेरिका) यांचे 'ग्रामगीता मानव जीवन उन्नती का पथ है' या विषयावर भाषण होईल. ७.३० ते ८.३० पर्यंत श्रीगुरुदेव मानवसेवा छात्रालयाच्यावतीने ‘स्वर गुरुकुंजाचे’ सादरीकरण होईल. रात्री १० ते ११.३० दरम्यान लक्ष्मणदास काळे यांचे कीर्तन होईल.
१५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता सर्वाधिकारी प्रकाश वाघ हे सामुदायिक यावर चिंतन व्यक्त करतील. सकाळी ६.४० ते १० या वेळेत पालखी व दिंडी यात्रा, तर सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत गोपालकाला होईल. संत-महंत, लोकप्रतिनिधी व देश विदेशातील गणमान्य व्यक्ती पुण्यतिथी महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ मंडळाने कळविले आहे.
मौन श्रद्धांजली १४ ऑक्टोबरला
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण मराठी पंचाग व तिथीनुसार अश्विन वद्य पंचमीला दुपारी ४.५८ वाजता १४ सप्टेंबर रोजी देशाच्या कानाकोपऱ्यातून पुण्यतिथी महोत्सवाला उपस्थित राहणारे लक्षावधी भाविक या वेळेला २ मिनिटे महासमाधीच्या दिशेने उभे राहून मौन राहून श्रद्धांजली अर्पण करतील. सात दिवसांपासून पुण्यतिथी महोत्सवाची लगबग या दोन मिनिटांसाठी शांत होते.