अमरावती - जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणा-या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ४९ वा पुण्यतिथी महोत्सव त्यांची कर्मभूमी गुरूकुंज मोझरी येथे येत्या ४ ते ११ आॅक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध खात्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी व गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.आठवडाभर चालणा-या या महोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन, जनजागृतीपर कार्यक्रम होतील. बुधवार ४ आॅक्टोबर रोजी सकाळी ४.३० वाजता तीर्थस्थापनेने महोत्सवाची सुरूवात केली जाईल. याच दिवशी सकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा निघेल. दररोज रात्री अनुक्रमे रेणुका खंडारे, जनार्दन राऊत, गणेश उर्फ रामपुरीजी, योगेश करंजीकर (शिर्डी), विलास साबळे, उद्धव गाडेकर, लक्ष्मणदास काळे महाराज यांचे कीर्तन होईल.मंगळवार १० आॅक्टोबरला सकाळी ९ वाजता अ.भा. श्रीगुरुदेव सेवमंडळ कार्यकर्ता संमेलन, दुपारी ३ वाजता श्री सद्गुरूआडकुजी महाराज संस्थान, वरखेड तथा जन्मभूमी यावली व तपोभूमी शेंदोळा येथील पालखींचे आगमन होईल. दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ पर्यंत ‘मौन श्रद्धांजली’ चा कार्यक्रम होईल. सायंकाळी ६ ते ६.४५ वाजता ‘अपना ग्राम ही तीर्थ बनाओ’ या कार्यक्रमात राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन लाभेल. यावेळी शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे उपस्थित राहतील.बुधवार ११ आॅक्टोबरला सकाळी सामुदायिक ध्यानानंतर ६.३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर विदर्भाच्या कानाकोप-यातून आलेल्या दिंडी, पालख्यांचे स्वागत व ग्रामप्रदक्षिणा घालण्यात येईल. सकाळी १० ते १२ वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे. यावेळी अनेक पदाधिकारी, आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार व मान्यवरांची उपस्थिती राहिल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवाचा देशभरातील सर्व गुरूदेवप्रेमी, भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्रीगुरुदेव सेवमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव ४ आॅक्टोबरपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 7:28 PM